वैजापूर,.ता.19 - तालुक्यातील नवनिर्वाचीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार व कृतज्ञता सोहळा महालगांव येथे रविवारी (ता.19) उत्साहात संपन्न झाला.
श्रीक्षेत्र सराला बेट चे महंत श्री.रामगिरी महाराज यांच्या आशीर्वाद वाचनाने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. या कार्यक्रमाला राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.अतुल सावे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर, वैजापूर पालिकेचे अध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, बांधकाम व अर्थ सभापती सचिन गरड, ज्ञानेश्वर मोटे , किशोर पवार, प्रा. संजय गव्हाणे, डॉ. तृप्ती राजपूत, जयेश मलदोडे, मनोज गायके, संजय पाटील निकम, अर्जुन पाटील, पंकज ठोंबरे, विशाल संचेती, रतन बत्तीसे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
प्रास्ताविक भाषणात जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी जिल्ह्यात प्रभावी व आगळे-वेगळे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. आतापर्यंत झालेल्या अध्यक्षांपेक्षा वेगळे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने माझ्यासारख्या सामान्य शेतकरी पुत्राला अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच पुढील काळात विकासकामे प्रभावीपणे करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी पाठीशी उभे राहावे, अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी बोलतांना नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी लाडक्या बहिणीसाठी शासनाने विविध योजना राबवल्या असल्याचे सांगितले. महिला आरक्षणासाठी काँग्रेसने विरोध केल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसचा निषेध केला.अविनाश गलांडे हे तालुक्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आमदार बोरणारे यांचे नाव न घेता त्यांनी घोषणा भरपूर झाल्या, मात्र संपूर्ण तालुक्याचा अपेक्षित विकास झाला नसल्याचे मत मांडले.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शहराप्रमाणे ग्रामीण भागालाही वेळ द्यावा आणि पुढील काळात संपूर्ण तालुक्यात भाजपचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती रामुकाका शेळके यांनी अतुल सावे यांच्याकडे केली. तर संजय खंबायते यांनी भाजपमध्ये काम करणाऱ्या हिंदू वारकऱ्यांवर अपशब्द वापरल्याच्या घटनेचा निषेध करत शरद पवार गटाचा निषेध व्यक्त केला.
शिवाजी ढवळे यांनी आपल्या भाषणात अविनाश गलांडे यांच्याशी 25 वर्षांची जुनी मैत्री असल्याचे सांगत त्यांचा अभिमान व्यक्त केला. चांगली माणसे राजकारणात असणे आवश्यक असल्याचे सांगून आदिवासी समाज त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गरीबातील गरीब व्यक्तींची कामे करावीत आणि आदिवासी समाजाचे होणारे स्थलांतर थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर ओबीसी तसेच गरीब मराठा समाजासाठी स्वतंत्र सारथी संस्था स्थापन केली असून त्याचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला असल्याचे आ .गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत वीजबिल माफी, दिवसा वीज, सोलर योजना, ऊस दराचे एफआरपी निश्चिती, लखपती दीदी योजना यांसारख्या योजना राबवल्याचे त्यांनी सांगितले. समाजकल्याण विभागामार्फत गोरगरिबांसाठी अधिक कामे करण्याच्या सूचना त्यांनी अतुल सावे यांना केल्या. वारकरी समाजाबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध करून अशा प्रवृत्तींना ठाम उत्तर देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच धर्मांतराच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्यागाचा उल्लेख करून संतांचा सन्मान राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
मंत्री अतुल सावे यांनी वंदे मातरम व भारत माता की जय या घोषणांनी भाषणाची सुरुवात करत अतुल सावे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी झालेल्या समन्वयामध्ये विविध नेत्यांनी सहकार्य केल्याचे सांगितले. उबाठा गटातून निवडून आलेले संजय निकम यांनीही मदत केल्याचा उल्लेख केला. महानगरपालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही अध्यक्षपद मिळवता आले, असे त्यांनी नमूद केले. अविनाश गलांडे यांच्या निवडीसाठी रामगिरी महाराज यांनीही संपर्क साधल्याचे सांगून सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. प्रलंबित योजना पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
महंत रामगिरी महाराज यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर झाल्यानंतर संभाजीनगर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून अविनाश गलांडे यांची निवड झाल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments