news today, राज्यात 20 ते 24 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई, ता. 20 - भारतीय हवामान खात्याच्या दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत 20 ते 24 एप्रिल या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 24 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 20 आणि 21 एप्रिल रोजी पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

नागरिकांसाठी सूचना ...

🔶विजेचा कडकडाट ऐकू आला किंवा विजेची चमक दिसताच तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. 
🔶झाडाखाली, मोकळ्या शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. 
🔶मोकळ्या जागेत मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. 
🔶निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे.
🔶शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातील कामे टाळावीत. 
🔶बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे. 
🔶यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे आयोजन तातडीने स्थगित करावे.
🔶नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे.

प्रशासनासाठी उपाययोजना ...

🔷ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी. 
🔷रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवावीत. 
🔷शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात. 
🔷हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित पोहोचवावेत.

Post a Comment

0 Comments