वैजापूर - श्रीरामपूर तालुक्याला जोडणाऱ्या कमलपूर पुलावरून पाणी ; वाहतूक खोळंबली
वैजापूर, ता. 09 / प्रतिनिधी -
नाशिक जिल्हयात जोरदार पाऊसामुळे विविध सिंचन प्रकल्पांतील जलपातळी वाढल्यामुळे पाटबंधारे विभागाने दारणा, गंगापूर धरणातून पाणी विसर्ग केल्याने गोदावरी नदीपात्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वैजापूर-श्रीरामपूर या दोन तालुक्यांना जोडणारा कमलपूर येथील वाहतूक पुलावरून पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने या मार्गावरील वाहतुकीचा वेग दोन दिवसांपासून थांबला आहे. तसेच वैजापूर तालुक्यातील डोणगाव येथून पुणतांबा ता.श्रीरामपूर जोडणा-या दुसऱ्या पुलाला पाणीपातळीने स्पर्श केल्याची महिती स्थानिकांनी दिली. दरम्यान काल सकाळी नऊ वाजेपर्यंत नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात 43 हजार 882 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. सायंकाळी सहाला 35 हजार 918 क्यूसेकवर आणण्यात आल्यामुळे प्रशासनाने नदीपात्रालगतच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे गंगापूर, दारणासह अन्य धरणांमधील विसर्गात वाढ करण्यात आली असून गोदावरीला तिसऱ्यांदा पूर आला आहे.
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 35 हजार 918 क्युसेस पाणी विसर्ग सुरु असून गोदावरी दुथडी भरुन वाहू लागल्याने गोदाकाठच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात घोटी व इगतपुरी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे पाण्याची चांगली आवक होत असून धरणांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. सद्य:स्थितीत पाणलोट क्षेत्रात असलेल्या प्रमुख धरणांमध्ये कालपर्यंत 34 हजार 341 द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध होता. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे काल सायंकाळी गंगापूर धरणातून ५ हजार १८६ क्युसेस, दारणा धरणातून ९ हजार ९३२ क्यूसेस पाणी विसर्ग करण्यात आला असून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ३९ हजार १७२ क्युसेस पाणी गोदापात्रात सोडण्यात आले आहे. या विसर्गामुळे गोदावरीचे पात्र तुडुंब भरून वाहत असून पूररस्थितीत वाढ होण्याची शक्यता आहे.
0 Comments