नगरसेवकपदासाठी आरक्षण सोडत बुधवारी....
वैजापूर, ता. 06 - राज्यातील नगरपालिका अध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत सोमवारी (ता.06) मंत्रालयात काढण्यात आली असून वैजापूर नगरपालिकेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव (ओबीसी सर्वसाधारण) निघाले आहे. नगराध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या 'भावी नगराध्यक्षांचा' स्वप्न भंग झाला आहे. दरम्यान नगरपालिका सदस्य पदासाठी बुधवारी (ता.08) आरक्षण काढण्यात येणार आहे. या सोडतीकडेही भावी नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या तीन चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले असून नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी बुधवारी ता. 08) प्रसिध्द करण्यात येणार असून त्याच दिवशी नगरसेकपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीकडेही इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वेळी वैजापूर नगरपालिकेचे अध्यक्षपद महिला राखीव होते. यावेळी नगराध्यक्षपद सर्वसाधारण (ओपन) निघेल अशी आशा बाळगून शहरातील विविध राजकीय पक्षाच्या मंडळींनी त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही इच्छुकांकडून करण्यात आले होते. मात्र, नगराध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपात सामील झालेले वैजापूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन विशालसेठ संचेती, शिवसेना शिंदे गटाचे डॉ.राजीव डोंगरे, शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी उपनगराध्यक्ष अकील सेठ, काँग्रेस पक्षात नव्यानेच दाखल झालेले डॉ.निलेश शाह या मंडळींचा हिरमोड झाला आहे. तर गेल्या वीस वर्षांपासून नगरपालिका ताब्यात असलेल्या भाजपचे डॉ.दिनेश परदेशी यांना पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. बोरणारे कुटुंबीयांकडे कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र असून ते ओबीसीमध्ये येत असल्याने आ.बोरणारे यांचे धाकटे बंधू संजय पाटील बोरणारे हे शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे अशी चर्चाही शहरात रंगली आहे. शिंदे गटाचेच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील साळुंके व डॉ.राजीव डोंगरे यांच्याकडेही कुणबी जातीचे प्रमाणपत्र असल्याची चर्चा असून त्यांचेही नाव चर्चेत आहे.
0 Comments