दुपारी एक वाजेपर्यंत सर्व निकाल लागतील असा अंदाज
छत्रपती संभाजीनगर, ता.18 - येत्या 20 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिका प्रभागातील जागांसाठीचे मतदान आणि त्यानंतर जिल्हयातील सर्व नगरपालिकांच्या मतमोजणीची तयारी याबाबत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (ता.16) विभागाची ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेतला.
या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, नगरपालिका प्रशासनाचे सहायक ऋषीकश भालेराव यांची उपस्थिती होती. निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी विभागातील सर्व जिल्ह्यांचा टप्प्याटप्प्याने आढावा घेतला. ईव्हीएम मशीन आणि स्ट्राँग रूमच्या सुरक्षेच्यादृष्टीने केलेल्या उपाययोजना, येत्या 20 डिसेंबरला होणाऱ्या नगरपालिका प्रभागातील जागांसाठी होणारे मतदान आणि 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीची माहिती घेतली.. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी प्रशासकीय तर पोलिस अधीक्षक डॉ.राठोड यांनी सुरक्षततेबाबत सादरीकरण केले.
जिल्हयात फुलंब्री नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि 17 सदस्यांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर पैठणच्या चार, वैजापूर दोन आणि गंगापूर येथील दोन जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. यासाठी वैजापूर व गंगापूर येथे प्रत्येकी सात मतदान केंद्रे आहेत. फुलंब्रीतील चार मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. मतदानासाठीची संपूर्ण तयारी झाल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी सांगितले.जिल्हयातील सात ठिकाणच्या स्ट्रांग रूमच्या सुरक्षितेसाठी एकूण 47 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.याठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान आणि मतमोजणीच्या काळातही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी दिली.
सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात होणार..
जिल्हयातील फुलंब्री, पैठण, वैजापूर आणि गंगापूर येथे नगरपालिका प्रभागातील राहिलेल्या जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी जिल्हयातील सहा नगरपालिका आणि एक नगरपंचायत अशा सातही ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. वैजापूर येथे 12, पैठण येथे 15, गंगापूर येथे 10, सिल्लोड येथे 12, कन्नड येथे15, खुलताबाद येथे 10 तर फुलंब्री येथे 10 टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व निकाल लागतील. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments