news today, जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणूक ; उमेदवारी अर्ज बाद झाल्यास कोर्टात जाता येणार नाही

जि.प.आणि प.स.निवडणुकीसाठी कायद्यात बदल ; कोर्टाचे दरवाजे उमेदवारांना बंद

मुंबई, ता.18 - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज बाद केल्यास कोर्टात जाता येणार नाही. उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल.,असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता.18) घेण्यात आला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या छाननीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात दाद मागता येते.तसेच प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर त्यावर संबंधित न्यायालयाने तीन दिवसांत निर्णय घ्यावा अशीही जिल्हा परिषद आणि नगरपालिका कायद्यात तरतूद आहे.त्यामुळे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला किंवा अर्ज वैध ठरला तरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अन्य उमेदवारांना कोर्टात दाद मागण्याचा अधिकार होता. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत याच तरतुदीचा वापर करीत अनेक ठिकाणी उमेदवारांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर तीन दिवसात निर्णय होऊ शकला नाही, परिणामी मतदानास काही तास उरलेले असतानाच 24 नगरपालिका आणि 154 सदस्यांच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगास घ्यावा लागला होता. स्थगित झालेल्या या निवडणुका आता 20 डिसेंबरला होणार आहे. 

या गोंधळाची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात कोर्टात दाद मागण्याची कायदेशीर तरतूदच रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश काढण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली.


Post a Comment

0 Comments