news today, इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन महिलांशी अश्लील चॅटींग करणारा सायबर पोलिसांच्या ताब्यात



इंस्टाग्रामवर बनविले होते बनावट खाते; सायबर पोलिसांची कारवाई 

वैजापूर, ता .10 -  इंस्टाग्रामवर महिलेच्या नावाने बनावट खाते तयार करुन अन्य महिलांशी अश्लील चॅटिंग करणाऱ्या एकास छत्रपती संभाजीनगर येथील सायबर पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील भऊर येथून ताब्यात घेतले. 

जलील शहा खलील इनामदार (रा.भऊर ता.वैजापूर) असे  पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील महिला तक्रारदाराच्या फोटोचा वापर करून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. हे खाते तयार केल्यानंतर त्याने इतर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तक्रारदार महिला असल्याचे भासवत त्यांच्या सोबत अश्लील संभाषण करायचा. सदरची बाब समजताच फिर्यादी महिलेने इंस्टाग्रामवर होणाऱ्या बदनामीस कंटाळून छत्रपती संभाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा सायबर पोलिसांच्या पथकाने तपास करुन सदर बनावट इंस्टाग्राम खात्याची माहिती प्राप्त केली. दरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता वैजापूर तालुक्यातील भऊर येथील जलील शहा खलील इनामदार याने त्याचे बहिणीच्या मोबाईलवर ओटीपी  घेऊन त्याचे स्वत:चे मोबाईल मध्ये  बनावट इंस्टाग्राम खाते तयार केले. हे खाते बनविल्यानंतर तो तक्रारदार महिलेच्या नावाचा व फोटोचा वापर करत होता. त्यावरून सायबर पोलिसांनी सदर इसमास शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या ताब्यात असलेल्या मोबाईल फोन तपासला असता महिलेच्या नावाचे फोटोचे इंस्टाग्राम खाते दिसून आले. अखेर त्यानेच हे बनावट खाते तयार केल्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, सहायक फौजदार कैलास कामठे, दत्ता तरटे, सविता जायभाये, मुकेश वाघ, योगेश तरमळे, राजेश राठोड आदींनी ही कारवाई केली.




Post a Comment

0 Comments