news today, आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदान यंत्रावर राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची नावे सुरुवातीला येणार

मतदान यंत्रावर अध्याक्षराप्रमाणे नावे ठेवण्याची पद्धत बंद...



मुंबई, ता.14 - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची मतदान यंत्रावर  अध्याक्षराप्रमाणे नावे ठेवण्याची प्रचलित पद्धत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महानगर पालिका, जिल्हा परिषद. आणि पंचायत समित्यांच्या येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी आता राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना मतदान यंत्रावर पहिल्या पंक्तीत स्थान स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचा मतदान यंत्रावरील प्राधान्यक्रम हा राष्ट्रीय, राज्यस्तरीय, इतर राज्यातील नोंदणीकृत , राज्य निवडणूक आयोग नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्ष आणि अपक्ष असा क्रम लावण्याची पद्धत आहे. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचा मतदान यंत्रावरील प्राधान्यक्रम हा मान्यताप्राप्त पक्षाप्रमाणे नव्हे तर उमेदवारांच्या अध्याक्षराप्रमाणे ठेवण्याची तरतूद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कायद्यात आहे.त्यामुळे राज्यातील आजवरच्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतपत्रिका किंवा मतदान यंत्रावर अध्याक्षराप्रमाणे उमेदवारांचा क्रम लावला जात असे.त्यामुळे आपले नाव पहिल्या पंक्तीत यावे यासाठी अनेक उमेदवार नाव बदलून घेत. परिणामी राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील उमेदवारांची नावे खाली जात असल्याने मतदारांचा गोंधळ होत असे.

निवडणूक नियमात सुधारणा ...

राज्य सरकारनेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नियमात सुधारणा केली असून आता नव्या नियमानुसार मतदान यंत्रावर उमेदवारांची नावे दर्शविताना प्रथम भाजप,  भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बसपा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आम आदमी पार्टी  या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची नावे झडकतील. त्यानंतर राज्यातील राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांची नावे लागतील. राज्यस्तरीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार), शिवसेना (शिंदे),  महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पाच पक्षांचा समावेश आहे. त्यानंतर अन्य राज्यात नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांची नावे असतील आणि शेवटी अपक्षांची नावे मतपत्रिकेवर लागणार आहेत.

Post a Comment

0 Comments