वैजापूर, ता.07 -
भाडेतत्वावर दिलेल्या वाहनाचे बिल काढण्यासाठी चक्क फोन-पेवर लाच स्वीकारणारा वैजापूर उपविभागीय जलसंधारण अधिकारी (शनिवारी ता.07) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागला. छञपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वैजापूर शहरातील अयोध्यानगर परिसरात ही कारवाई केली. निखिल अशोक कवाडे ( उपविभागीय जलसंधारण अधिकारी, वैजापूर जलसंधारण विभाग जिल्हा परिषद कार्यालय, छत्रपती संभाजीनगर - वर्ग-१) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने मोहीम राबवत असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक मोठी कारवाई करत प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
वैजापूर जलसंधारण विभागातील एका वर्ग -1 अधिकाऱ्याला 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तंत्रज्ञानाचा वापर करत हा लाचेचा व्यवहार चक्क 'फोन पे' (PhonePe) या ऑनलाईन माध्यमाद्वारे करण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्याच्या अंगाशी आला आहे. निखिल अशोक कवाडे (वय 33 वर्ष) असे या अटक करण्यात आलेल्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांची 'टूर्स अँड ट्रॅव्हल्स'ची एजन्सी आहे. त्यांनी आपली बोलेरो गाडी जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणाऱ्या वैजापूर जलसंधारण विभागाला मासिक भाडेतत्त्वावर दिली होती. या गाडीचे भाड्याचे बिल प्रलंबित होते. हे प्रलंबित बिल तयार करणे, एम.बी. बुक (Measurement Book), लॉग बुक आणि काँटीजेन्सी बिल यावर स्वाक्षरी करून ते अंतिम मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे पाठवणे, हे काम आरोपी निखिल कवाडे यांच्या अखत्यारीत होते. मात्र, हे हक्काचे बिल पुढे पाठवण्यासाठी कवाडे यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. सरकारी काम करण्यासाठी अशाप्रकारे पैशांची मागणी झाल्याने तक्रारदार संतप्त झाले आणि त्यांनी लाच न देण्याचा निर्णय घेत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची गंभीर दखल घेत 7 मार्च 2026 रोजी सापळा रचला. विभागाच्या पथकाने आधी लाचेच्या मागणीची पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान, आरोपी निखिल कवाडे याने 10 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर 7 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. धक्कादायक बाब म्हणजे, रोकड पकडली जाण्याच्या भीतीने कवाडे याने ही रक्कम 'फोन पे' द्वारे ऑनलाईन स्वीकारण्याचे मान्य केले. वैजापूर येथील अयोध्या नगर परिसरात हा सापळा लावण्यात आला होता. तक्रारदाराने जसे 7 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले, तसाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने कवाडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्यातील डिजिटल व्यवहारांचे विश्लेषण सध्या सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा पथकाचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब सदाशिव शिंदे यांनी केले, तर पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पथकामध्ये अनवेज शेख, प्रकाश डोंगरदिवे आणि चांगदेव बागुल या पोलीस अंमलदारांचा समावेश होता. आरोपी निखिल कवाडे याच्या घरातील झडतीचे कामही रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी जर कोणी अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर फी व्यतिरिक्त पैशांची मागणी करत असेल, तर घाबरून न जाता तातडीने एसीबीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी जनतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून वैजापूर परिसरात याचीच चर्चा रंगली आहे.
0 Comments