news today, कुठलीही पूर्वसूचना न देता बोर नदीला पाणी सोडले ; पाण्यात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

वैजापूर तालुक्यातील करंजगाव शिवारातील घटना ..  पाटबंधारे विभागाचा निष्काळजीपणा ; ग्रामस्थांमध्ये संताप 

वैजापूर, ता.16 - तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी प्रकल्पातून 16 मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोणतीही पूर्वसूचना न देता बोर नदीमध्ये पाणी सोडण्यात आल्याने पाण्यात वाहून करंजगाव येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  

करंजगाव शिवारातील शेतकरी भानुदास मगर व राहुल मगर हे बैलगाडीने बोर नदी ओलांडत असताना अचानक आलेल्या पाण्याने भानुदास गंगाधर मगर (वय 85 वर्ष, रा. करंजगाव) हे पाण्यात वाहून गेले. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास  समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. या दुर्घटनेत त्यांच्या गायीचा देखील यात मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, त्याच वेळी परिसरातील इंग्रजी शाळेतील बसेस येत होत्या. चालकांनी सतर्कता दाखवत दोन्ही बाजूंना तत्काळ बस थांबवल्यामुळे बसमधील मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून कोणतीही पूर्वसूचना न देता नदीत पाणी सोडल्यामुळे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणा विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत चौकशी करण्यात येऊन हलगर्जी करणाऱ्या पाटबंधारे विभागातील कारणीभूत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments