उपसभापतीपदी सोनाली जाधव यांची बिनविरोध निवड
वैजापूर, ता.10 - वैजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी संवंदगाव गणातील शिवसेना सदस्या वंदना बाळू शिंदे यांची तर उपसभापतीपदी शिवसेना पुरस्कृत शिऊर गणातील सोनाली किशोर जाधव यांची मंगळवारी (ता.10) बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती पद हे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी पाच वर्षासाठी राखीव आहे.
वैजापूर पंचायत समितीत निवडून आलेल्या सभापती व उपसभापती यांचा आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी सत्कार केला.
सभापती पदासाठी महालगाव गणातील भाजपच्या सदस्या शीतल राहुल आल्हाट व उपसभापती पदासाठी लाडगाव गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहुल बाबासाहेब लांडे यांनी आपले उमेदवारी अर्ज पिठासीन अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्याकडे दाखल केले होते. मात्र, दिलेल्या वेळेत त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वंदना शिंदे यांची सभापती म्हणून तर सोनाली जाधव यांची उपसभापती म्हणून निवड झाल्याचे डॉ जऱ्हाड यांनी घोषित केले. या सभेला सर्व सोळा सदस्य उपस्थित होते.
सोळा सदस्य असलेल्या वैजापूर पंचायत समितीत शिवसेना सात सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस चार, भाजप दोन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) एक व अपक्ष एक असे संख्याबळ आहे. शिवसेनेचे आमदार रमेश पाटील बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, जिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप व माजी नगराध्यक्ष साबेरखान यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेच्या सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या अप सभापतीची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.
तब्बल आठ वर्षाहून अधिक कालावधीनंतर महत्वाचे पद असलेल्या या खुर्चीवर पदाधिकारी विराजमान होणार असल्याने पंचायत समितीत चैतन्याचे वातावरण बघायला मिळाले. आमदार रमेश बोरनारे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी रामहरी जाधव, राजेंद्र साळुंके, सुभाष तांबे, भागीनाथ मगर, दीपकसिंह राजपूत, श्रीराम गायकवाड, हुसेन शेख, सुनील कदम, अंकुश हिंगे, प्रकाश शेळके, अमोल बावचे, पारस घाटे, महेश बुनगे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments