news today, वीरगाव ग्रामपंचायतीत 'लाखोंचा' अपहार ? बनावट कागदपत्रांच्या आधारे निधी हडपल्याचा उपसरपंचांचा आरोप

वैजापूर, ता.21 - वैजापूर तालुक्यातील वीरगाव-मुर्शदपूर ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सन 2021 ते 2026 या कार्यकाळात सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे आणि बोगस बिलांच्या आधारे केंद्र व राज्य शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा खळबळजनक आरोप खुद्द माजी उपसरपंचांनी केला आहे. 

या संदर्भात कदम यांनी गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. गेल्या पाच वर्षांत पंधराव्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. केंद्र सरकारच्या 'ई-ग्राम स्वराज्य' आणि 'माझी पंचायत' या पोर्टल्सवर उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास केला असता, धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.असे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदाराने पुराव्यांसह असा दावा केला आहे की, केवळ नाली दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे 12 लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्षात जमिनीवर इतक्या मोठ्या प्रमाणात काम झाले आहे का ? हा मोठा प्रश्न आहे. केवळ कागदोपत्री घोडे नाचवून कामांचे अस्तित्व नसतानाही बिले काढण्यात आल्याचा संशय कदम यांनी व्यक्त केला आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मासिक सभा, विशेष सभा आणि चक्क ग्राम सभांमध्येही बोगस ठराव पारित केल्याचा संशय तक्रार अर्जात नमूद करण्यात आला आहे. अनेक कामे पूर्ण न करताच त्यांची पूर्णत्वाची प्रमाणपत्रे जोडून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी भरत कदम यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments