news today, जायकवाडी पाणी वाटपाबाबत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

छत्रपती संभाजीनगर, ता.08 - जायकवाडी धरणातील पाणीवाटप, सिंचनाचे नियोजन आणि भविष्यातील जलसुरक्षा लक्षात घेऊन कालवा सल्लागार समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक पैठण येथील संतपीठात जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.08) पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार, संतुलित पाणीवाटप आणि परिणामकारक जलव्यवस्थापन या मुद्द्यांना प्राधान्य देत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.


बैठकीत जायकवाडी धरणातील पिण्याच्या पाण्यासाठी डाव्या आणि उजव्या कालव्यातून समान प्रमाणात चार आवर्तनांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नांदूर मधमेश्वर कालवा आणि निम्न दुधना प्रकल्पांतून उन्हाळ्यात चार आवर्तनांचे नियोजन करून पाणीवाटप अधिक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत, डाव्या कालव्यासारखीच उजव्या कालव्यासाठीही चार आवर्तनांना मंजुरी देण्यात आली. भविष्यातील जलसाठा वाढवण्यासाठी आणि शाश्वत सिंचन प्रणाली निर्माण करण्यासाठी केटी वेअर बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे. तसेच जायकवाडी धरणातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवण्यासाठी राज्यस्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याची दिशा ठरविण्यात आली. हे निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारे, पाणीवाटपात समतोल राखणारे आणि प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे ठरणार असल्याचे मत जलसंपदामंत्र्यांनी व्यक्त केले. 

या बैठकीत वैजापूर मतदारसंघातील शनी देवगाव येथील उच्च पातळी बंधारा, नांदूर मधमेश्वर, शिवना-टाकळी, पाणी आरक्षण, भूसंपादन, दुरूस्तीची कामे तसेच उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी केली. 
जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांनी या बैठकीत आपले प्रखड मत मांडून प्रलंबित कामांना वाचा फोडली तसेच शनिदेवगाव उच्च पातळी बंधाऱ्याला 2022 साली प्रशासकीय मान्यता मिळालेली नसून आता त्या बंधार्‍याची प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात असल्याचे निदर्शनास आणून दिले.

या बैठकीस खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, आमदार विजयसिंह पंडित, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार अमरसिंह पंडित, आमदार रमेश बोरणारे, आमदार हिकमत उढाण, आमदार विलास भुमरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आमदार नारायण कुचे, आमदार प्रकाशदादा सोळंके सहभागी झाले होते.  याशिवाय जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता भरत शिंगाडे, निम्न दुधना प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता जगताप तसेच बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यांतील जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments