गोंधळानंतर माजी सभापती साहेबराव पाटील औताडे यांच्या नाव निश्चित
वैजापूर, ता .09 - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रतिनिधी पाठविण्यासाठी बोलावण्यात आलेल्या वैजापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या बैठकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला. युतीमधील दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांना ढकलले आणि कपडेही ओढले. शिंदे गटाचे रावसाहेब मोटे यांनी तर चक्क व्यवस्थापक अनिल चव्हाण यांची गचांडी पकडली. व्यवस्थापकाची गचांडी पकडल्यामुळे संतापलेल्या भाजपचे साहेबराव पाटील औताडे यांनी रावसाहेब मोटे यांचे बखोट धरून त्यांना बाजूला लोटले. या सगळ्या गदारोळात शिंदे गटाच्या सदस्यांनी सभेचे इतिवृत्त पळवले. गोंधळ संपल्यानंतर माजी सभापती साहेबराव पाटील औताडे यांचे नाव बँक प्रतिनिधी म्हणून निश्चित करण्यात आले.
जिल्हा बँकेवर प्रतिनिधी पाठवण्यासाठी बुधवारी (ता.08) वैजापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची बुधवारी (ता.08) दुपारी विशेष सभा बोलावण्यात आली होती. अध्यक्ष सहकार अधिकारी तथा प्रशासक ओंकार देवापूरे हे होते. बैठकीच्या सुरुवातीलाच कोरम पूर्ण नाही, फक्त मर्जीतल्या सदस्यांनाच बैठकीला बोलावण्यात आल्याचा आक्षेप शिंदे गटाचे सदस्य रावसाहेब मोटे यांनी घेतला. सहकार अधिकारी तथा प्रशासक ओंकार देवापुरे यांनी हा आक्षेप मान्य करत सभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली. यामुळे शिंदे गट व भाजप सदस्यां मध्ये वाद निर्माण झाला. शिंदे गटाचे रावसाहेब मोटे हे व्यवस्थापक अनिल चव्हाण यांच्या अंगावर धावून गेले व त्यांनी चव्हाण यांची गचांडी पकडून त्यांना ढकलून दिले. हे पाहून माजी सभापती साहेबराव औताडे हे संतापले व त्यांनी रावसाहेब मोटे यांना खेचतच दुर लोटले. या सगळ्या गोंधळात रावसाहेब मोटे व त्यांच्या समर्थकांनी बैठकीचे इतिवृत्त पळवून नेले. काही वेळानंतर गोंधळ शांत झाल्यानंतर कोरम अभावी तहकूब केलेली सभा अर्धा तासांनी उपस्थित सभासदांमध्ये पुन्हा सुरू करण्यात आली.यावेळी सर्वानुमते माजी सभापती साहेबराव औताडे यांच्या नावाचा बॅंक प्रतिनिधी म्हणून ठराव पारित करण्यात आला. ठरावाचे इतिवृत्त नव्याने बनवून सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल करण्यात आले.
बँक प्रतिनिधी म्हणून नाव निश्चित झाल्यानंतर या ठरावाचे इतिवृत्त सहायक निंबंधक यांना सादर करतांना माजी सभापती साहेबराव पाटील औताडे व इतर सदस्य
या सभेस जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, श्रीराम गायकवाड, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष साहेबराव औताडे,, बाजार समीतीचे माजी सभापती भागीनाथ मगर, राजेंद्र साळुंके ,सुर्यभान जगताप, रावसाहेब जगताप, सुभाष आव्हाळे, केतन आव्हाळे, भगवान गायकवाड , प्रविण तांबे, सतीश शिंदे, अमोल बावचे, बाबासाहेब लांडे आदींसह सभासदांची उपस्थिती होती.
0 Comments