'त्या' प्रेमीयुगुलांची प्रेमकहाणी अडकली कायद्याच्या चौकटीत ...
वैजापूर, ता.13 - शहरातील एका प्रेमप्रकरणाने सोमवारी वैजापूर पोलिस ठाण्यात अक्षरशः नाट्यमय वातावरण निर्माण केले. प्रेमासाठी घर सोडून थेट पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने 'मी माझ्या प्रियकराशीच लग्न करणार' असा ठाम पवित्रा घेतल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रेम, कुटुंब आणि कायदा या तिन्हींच्या संघर्षाचा हा प्रसंग दिवसभर शहरात चर्चेचा विषय ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरातील 23 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय मुलगी यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचे एकमेकांवर असलेले आकर्षण हळूहळू गंभीर नात्यात बदलले. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिचे लग्न दुसरीकडे लावून देण्याच्या हालचाली सुरू केल्या. कुटुंबाकडून विवाहाची तयारी सुरू झाल्याचे समजताच मुलीने धाडसी निर्णय घेतला आणि ती प्रियकरासोबत घरातून निघून थेट पोलिस ठाण्यात दाखल झाली. पोलिस ठाण्यात पोहोचताच तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, 'मला जबरदस्तीने दुसऱ्याशी लग्न करायचे नाही. मी त्याच्याशीच विवाह करणार.'
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी तात्काळ हस्तक्षेप केला. महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुलगी, तिचा प्रियकर आणि कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले.
पोलिसांनी प्रथम शांततेत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. मुलगी मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहून वारंवार एकच गोष्ट सांगत होती 'माझे आयुष्य माझे आहे… मला त्याच्यासोबतच राहायचे आहे.' या प्रेमकथेतील भावनिक बाजू जितकी ठळक होती, तितकाच कायद्याचा अडसरही मोठा होता. पोलिसांनी मुलीला समजावून सांगितले की, ती अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार विवाह करणे शक्य नाही. तसेच तिच्या कुटुंबीयांनाही मुलगी सज्ञान होईपर्यंत विवाह न करण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. पालकांना यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आली.
समुपदेशनाच्या अनेक फेऱ्या झाल्या, नातेवाईकांनीही समजावण्याचा प्रयत्न केला; पण मुलगी कोणतेही म्हणणे ऐकण्यास तयार नव्हती. 'मी त्याच्याशिवाय कुणाशीही लग्न करणार नाही,” या भूमिकेवर ती शेवटपर्यंत ठाम राहिली. तिच्या हट्टामुळे पोलिसांसमोर मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला.
प्रेमकहाणी घरातून थेट पोलिस ठाण्यापर्यंत ...
अल्पवयीन असल्याने तिला प्रियकरासोबत पाठविणे शक्य नव्हते आणि ती पालकांसोबत जाण्यासही तयार नव्हती. अखेर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलीची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृहात करण्यात आली. प्रेमासाठी घर सोडून पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचलेली ही घटना दिवसभर शहरात चर्चेचा विषय ठरली. प्रेम, पालकांची चिंता आणि कायद्याच्या चौकटीत अडकलेली ही कहाणी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करून गेली.
0 Comments