वैजापूर, ता.11 - मंदिराच्या पुजाऱ्याला काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणातील तीन आरोपीस पाच महीन्याचा कारावास व पाच हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस.काळे यांनी हा निकाल दिला.
तालुक्यातील बाभूळगाव गंगा येथे श्रीराम मंदीर आहे. या मंदीराचे पुजारी नारायणगिरी महाराज हे आहेत. श्रीराम मंदिराच्या परीसरात राजेंद्र कुंजीर हे वाळू वाहतूक करण्यासाठी वापरत असलेले जेसीबी, पोकलेन व ट्रक्टर ही वाहने उभी करत असत. या वाहनांमुळे भाविकांना त्रास होत होता. त्यामुळे ही वाहने येथून काढा.असे पुजारी नारायणगिरी महाराज यांनी कुंजीर यांना सांगितले. याचा राग आल्याने 9 सप्टेंबर 2016 रोजी राजेंद्र रामभाऊ कुंजीर, बाळासाहेब शिवाजी कुंजीर व शिवाजी रामभाऊ कुंजीर (रा.बाभूळगाव गंगा) यांनी लाकडी दांडक्याने नारायण गिरी महाराज यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करून हवालदार के.एम.मोरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने हा निकाल दिला.
आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 326 आणि 452 अंतर्गत दोषी ठरवले. गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता गोविंद कुलकर्णी यांनी बाजू मांडली. तर सरकारी अभियोक्ता संजय बारसे यांनी मदत केली.
0 Comments