news today, शिऊर बंगला येथे हॉटेलसह इतर आठ दुकानांना भीषण आग, लाखोंचे साहित्य जळून खाक

वैजापूर, ता.11 - तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी (ता 11)  पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृह समोरील गॅरेजला आग लागली. ही बाब कुणाच्याही लक्षात न आल्याने इतर शेजारची दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. तासाभरात आठ ते दहा दुकानांना भीषण आग लागून दुकान, हॉटेल मधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. 


स्थानिक नागरिक आणि हॉटेल व दुकान व्यावसायिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग वेगाने पसरल्याने वेळेत आटोक्यात आणता आली नाही. खबरदारी म्हणून इतर व्यावसायिकांनी साहित्य बाहेर काढत आपापली दुकाने खाली केली. दरम्यान, पेट्रोलिंगवर असलेले शिऊर पोलिस कर्मचारी सुभाष ठोके यांनी इतर सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत छत्रपती संभाजीनगर आणि वैजापूर अग्निशामक दलाला पाचारण केले. आगीच्या एक तासानी दोन्ही बंब दाखल होऊन आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे शेजारची आणखी काही हॉटेल आणि दुकाने या दुर्घटनेतून वाचली. या घटनेत, टपरीचालक, गॅरेज, हॉटेल आणि इतर दुकाने जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार प्रा रमेश बोरनारे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांनी सकाळी सहाच्या सुमारास घटनास्थळी येऊन पाहणी केली. या आगीत सुरेश तुपे, नंदू जाधव, कांतिलाल राजपूत, अंबादास निकम, संजय बोरसे, मयूर निकम, श्रीकांत चव्हाण या व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

Post a Comment

0 Comments