news today, वैजापूर पोलिसांची तत्परता ; हरवलेला ऐवज महिलेला मिळाला परत

वैजापूर, ता.11 - बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलेचा हरवलेला ऐवज वैजापूर पोलिसांनी तत्परतेने तांत्रिक तपासाच्या आधारे शोध लावून महिलेला सुपूर्द केला. शुक्रवारी सायंकाळी उशिरा वैजापूर पोलिसांनी ही कामगिरी केली. याबद्दल ज्योती होन (रा. शिवराई) या महिलेने पोलिसांचे आभार मानले आहेत तसेच पोलिसांचेही सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

     वैजापूर तालुक्यातील शिवराई येथील महिलेचे                     बाजारपेठेत हरवलेले पाकीट पोलिसांनी मिळवून दिले...

ज्योती होन या तालुक्यातील शिवराई येथील रहिवासी आहेत. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील आंबेडकर चौक ते झगडा फाटा परिसरात असलेल्या बाजारपेठात त्या साहित्य खरेदी करत होत्या. यावेळी त्यांचे रोख रक्कम व काही दागिने असलेले पॉकेट हरवले. त्यांनी तत्काळ वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या आदेशाने सीसीटीव्ही अंमलदार किरण रावते यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासादरम्यान झगडा फाटा येथे महिलेचे पॉकेट पडल्याचे पोलिसांना दिसून आले. तसेच ते पॉकेट मोटारसायकलवरील (एम.एच.17 सी.पी. 1266) व्यक्तीस सापडल्याचे समजले. लगेचच पोलिसांनी 'त्या' वाहन क्रमांकाच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेतला. लहानू जाधव (रा. खोपडी, ता. कोपरगाव) यांनी ते पॉकेट सापडल्याचे सांगितले. त्यांनी पॉकेटमधील वस्तू न पाहता ते पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी ठेवले असल्याचे पोलिसांना सांगितले. 

पोलिस अंमलदार किरण रावते यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन लहानू जाधव यांच्याकडून पॉकेट ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले. ज्योती होन यांच्या उपस्थितीत पॉकेट उघडून पाहिले असता त्यामध्ये 10 हजार 500 रुपये रोख रक्कम, चांदीचे पैंजण आणि घराच्या चाव्या मिळून आल्या. त्यानंतर सर्व साहित्य ज्योती होन यांच्या ताब्यात देण्यात आले.


Post a Comment

0 Comments