वैजापूर, ता.10 - वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट मध्ये लिलावात कांद्याला इतर बाजारभाव तुलनेत व्यापाऱ्यांकडून भाव कमी पुकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. दरम्यान शेतकरी आक्रमक झालेले पाहून तेथील कर्मचाऱ्यांनी देखील धूम ठोकली.
जवळपास तीन तास शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या दिला. मात्र या काळात बाजार समितीच्या संचालकांपैकी एकही संचालक न आल्याने संचालकांच्या नाम फलकाची कांदा मार्केटच्या कार्यालयासमोर शेतकरी संघटनेकडून होळी करण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांनी आम्ही हे पेटवण्यामागचं कारण एकही संचालकाला शेतकऱ्यांशी देणघेण नाही, तीन तासांपासून बसूनही एकही संचालक न आल्याने ही आक्रमक भूमिका घेण्यात आली असे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान कर्मचारी व व्यापारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर फेर लिलाव घेण्यात आला ज्यामध्ये 200-400 रुपयांचा फरक वाढून शेतकऱ्यांना मिळाला. मात्र, काहींना आहे तोच भाव मिळाला.यावेळी सभापती कल्याण दांगोडे व संचालक बद्री अण्णा गायकवाड यांनी कांदा मार्केटमध्ये हजेरी लावली. मात्र अन्य संचालक कोणीही सायंकाळ पर्यंत फिरकले नाही.
व्यापाऱ्यांची घेतली हजेरी...
बाजार समितीकडून परवाने देण्यात आलेल्या व्यापाऱ्यांपैकी किती व्यापारी हजार आहेत असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. दरम्यान शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचीच हजेरी घ्यायला लावली तेव्हा केवळ 15 व्यापारी हे मार्केटला उपस्थित होते. गैरहजर व्यापाऱ्यांना नोटीस काढून परवाने रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.
0 Comments