news today, वैजापूर शहरातील शासकीय गोदामातून 130 क्विंटल मका चोरीला

वैजापूर, ता. 22 - शहरातील आठवडी बाजार परिसरातील शासकीय धान्य पुरवठा विभागाच्या गोदामातून तब्बल 130 क्विंटल मका चोरीला गेल्याची घटना समोर आल्याने प्रशासकीय व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. सरकारी धान्याच्या या मोठ्या चोरीमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, या संपूर्ण प्रकरणावर अनेक गंभीर प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत.

.   बाजारातळ परिसरात असलेले हेच ते शासकीय गोदाम 

चोरट्यांनी गोदामाच्या खिडकीला बसवलेले लोखंडी पत्रे कापून टाकले. त्यानंतर खिडकीचे गज काढून आत प्रवेश करत मोठ्या प्रमाणात मका लंपास केला. शुक्रवारी विभागाला या चोरीची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलिसांना कळविण्यात आले. मात्र, शनिवारी दुपारपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली नव्हती. या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एकाच रात्री 130 क्विंटल मका चोरी कसा होऊ शकतो ? दर्गाबेस परिसर हा शहरातील वर्दळीचा भाग मानला जातो. येथे दिवसरात्र नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात धान्य एकाच वेळी नेणे जवळपास अशक्य असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ही चोरी अनेक दिवसांपासून टप्प्याटप्प्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने होत असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जर चोरी खरोखरच अनेक दिवस सुरू होती, तर पुरवठा विभागाला याची भणक का लागली नाही? गोदामाची नियमित तपासणी होत होती का? साठ्याची पडताळणी शेवटची कधी करण्यात आली? गोदामाची जबाबदारी नेमकी कोणाकडे होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तपासाच्या केंद्रस्थानी येणे आवश्यक आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासकीय गोदामात कोणतीही प्रभावी सुरक्षा व्यवस्था नव्हती. ना सुरक्षा रक्षक तैनात होता, ना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुविधा होती. कोट्यवधी रुपयांच्या सरकारी धान्याची सुरक्षा अक्षरशः रामभरोसे सोडण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे ही घटना प्रशासकीय निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण मानली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वेळेवर साठ्याची तपासणी झाली नसती तर हे प्रकरण आणखी बराच काळ दडपून राहिले असते. आता प्रश्न केवळ चोरीचा नाही, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारी धान्य गायब होत असताना संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना याची माहिती कशी मिळाली नाही? हाही आहे. दर्गाबेस येथील शासकीय गोदामातून तब्बल 130 क्विंटल मका गायब होणे ही साधी चोरी नसून संपूर्ण सरकारी व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे. आता पोलिस या चोरीमागील सत्य किती लवकर उघड करतात आणि तपास केवळ चोरट्यांपुरता मर्यादित राहतो की विभागीय जबाबदाऱ्यांचाही शोध घेतला जातो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या प्रकरणात जितके प्रश्न चोरट्यांवर उपस्थित होत आहेत, तितकेच प्रश्न प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही उपस्थित होत आहेत. दरम्यान याप्रकरणी नायब तहसीलदार प्रवीण काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोदामाची सुरक्षा, साठा पडताळणी व्हावी ...

याशिवाय, या प्रकारामुळे शासकीय धान्य साठवणूक आणि त्याच्या देखरेखीच्या यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  धान्याची अशी चोरी होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ चोरट्यांचा शोध घेणे पुरेसे ठरणार नाही, तर संबंधित गोदामाची सुरक्षा, साठा पडताळणीची पद्धत, जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका आणि संभाव्य निष्काळजीपणाचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments