छत्रपती संभाजीनगर, ता.22 - छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. या निवडणुकीसाठी जिल्हयातील मंत्री, आमदार, खासदारांसह दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असे चित्र आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या 4 जुलै 2026 रोजी होणार आहे. त्यादृष्टीने हालचालींना वेग आला असून या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करण्यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयात रविवारी (ता.21) पार पडली. जिल्हा बँकेत मागील निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहा संचालक निवडून आले होते. त्यामुळे यावेळी स्वतंत्र पॅनल उभे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस खासदार डॉ कल्याण काळे, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तायडे, माजी आमदार नामदेव पवार, सुभाष झांबड आदी उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांच्याशी फोनवर संपर्क साधण्यात आला. त्यांनी पॅनलसाठी समंती दिली आहे असे बँकेचे माजी संचालक जगन्नाथ काळे यांनी सांगितले.
बँकेच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार.संदीपान भुमरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार रमेश बोरणारे, आमदार रंजना जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर, आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर या दिग्गजांनी उमेदवारी दाखल केली ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल असे चित्र आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 23 जून असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल
0 Comments