वैजापूर, ता.20 - वैजापूर-शिर्डी महामार्गालगत बेलगाव शिवारात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या गूढाचा स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांनी छडा लावला असून, परराज्यातील एका मजुराची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
17 जून रोजी सकाळी बेलगाव शिवारातील पडीत शेतातील झुडपांमध्ये एका अनोळखी पुरुषाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळावर सापडलेल्या मोबाईल फोनच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईलमधील छायाचित्र परिसरातील नागरिकांना दाखविल्यानंतर संबंधित व्यक्ती शंकर ज्ञानदेव मलिक यांच्याकडे काम करत असल्याची माहिती मिळाली. चौकशीत मृताची ओळख सीताराम सज्जनलाल बावरी (वय 30 वर्ष, रा. रुपाहेलीकला, ता. हुरडा, जि. भिलवाडा, राजस्थान) अशी पटली.
गोपनीय माहितीच्या आधारे राहुल उर्फ कुणाल पप्पू कुंभारकर (वय 18 वर्ष, रा.पोटे गल्ली, वैजापूर) आणि ऋषिकेश उर्फ सोनू अजय त्रिभुवन (वय 23 वर्ष, रा. बेलगाव, ता.वैजापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, भागीनाथ वाघ, पोलीस अंमलदार कासीम शेख, विष्णू गायकवाड सायबर सेलचे योगेश तरमाळे व जीवन घोलप यांनी ही कारवाई केली.
0 Comments