news today, अखेर फौजदार एकनाथ नागरगोजे व पोलिस कॉन्स्टेबल बणगे निलंबित ; दोघांना अटक

निलंबित होताच गुन्हे शाखेकडून दोघांनाही अटक ; शिक्षक मृत्यू प्रकरणाचे गंभीर पडसाद

वैजापूर, ता .17 - वेरूळ येथील शिक्षक सुरेश रुपचंद बोरसे (वय 51 वर्ष) यांच्या मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून वैजापूरचा पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक बनगे या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाची कारवाई होताच नागरगोजे आणि बनगे यांना अटक करून रत्नपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

.                    फौजदार एकनाथ नागरगोजे 

वेरूळ येथील शिक्षक असलेले सुरेश बोरसे यांचे 11 जून 2026 रोजी निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींविरुद्ध पत्नी अनिता सुरेश बोरसे (वय 47 वर्ष) यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 106(1) व 131 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सखोल तपासाचे आदेश दिले. तसेच प्राथमिक चौकशीही सुरू करण्यात आली. चौकशीत उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे व पोलीस अंमलदार वाल्मिक बनगे हे दोषी आढळल्याने दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांच्या जबाबांच्या आधारे नागरगोजेला  या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या तो खुलताबाद पोलीस ठाण्यात एलसीबीच्या ताब्यात आहे.

काय आहे प्रकरण?

वैजापूर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, पोलिस काॅन्स्टेबल वाल्मिक बणगे हे वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील प्राणघातक हल्ल्यातील आरोपीच्या शोधात वेरुळ येथे गेले होते. तेथे गेल्यानंतर शिक्षक सुरेश बोरसे यांच्याशी वाद होऊन त्यांना मारहाण करून वाहनात डांबले. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. विशेष म्हणजे नागरगोजेसोबत या प्रकरणातील फिर्यादी होता. एका खासगी वाहनातून हे तेथे गेले होते. सुरुवातीला पोलिस खात्याने काहींना तत्काळ अटक करण्याची तत्परता दाखवली खरी. परंतु अन्य आरोपी 'अज्ञात' दाखवून पोलिस खात्याची इभ्रत वाचविण्याचा प्रयत्न केला. परिणामी नागरगोजे व बणगे हे दोघेही अद्याप मोकाटच होते. पोलिस दलाने त्यांना अभय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु लोकप्रतिनिधींचा वाढता राजकीय दबाव व शिक्षक संघटनांच्या रेट्यामुळे पोलिस प्रमुखांना आपल्याच खात्यातील मावळ्याविरुध्द कारवाई करणे भाग पडले.

प्राथमिक अहवालात काय ...

आरोपीला पकडण्यासाठी फिर्यादीला सोबत घेऊन जाणे, तपासला जाताना खासगी वाहनाचा वापर करणे, रत्नपुर पोलीस ठाण्यात तपासासाठी आल्याची नोंद न करणे, सुरेश बोरसे यांना निष्कारण मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे असा ठपका फौजदार एकनाथ नागरगोजेवर ठेवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments