pentioners news शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) पेन्शनर्स व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी सदैव खुले - अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे

 


छत्रपती संभाजीनगर, ता.29 /प्रतिनिधी -
महाराष्ट्र राज्यातील सर्व ठिकाणच्या जेष्ठ पेन्शनर्स व जेष्ठ नागरिकांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) हे विनामुल्य सेवेसाठी सदैव खुले असेल व मी वैयक्तिक त्यांची देखभाल करेल असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व घाटी रुग्णालय प्रमुख शिवाजीराव  सुक्रे यांनी रविवार (ता.29) रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बजाज अध्ययन कक्ष सभागृहात जिल्हा पेन्शनर्सच्यावतीने आयोजित पेन्शनर्सच्या सर्वसाधारण सभेत केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत सबनीस होते तर मुंबई पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष कमलेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ सुक्रे पुढे म्हणाले की, पेन्शनर्स व जेष्ठ नागरिक या देशाची धरोहर आहे, त्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी शासकिय आरोग्य सेवा कटीबद्ध आहे. मुंबई पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष कमलेश क्षीरसागर यांनी विशद केले की,भारतीय राज्यघटना कलमनुसार भेदभाव न करता सर्वांना समानतेचा अधिकार आहे, त्या दृष्टीने शासनाने देशातील सर्व पेन्शनर्सना समान लेखून त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेऊ नये. असे सांगून मुंबई संघटना राबवित असलेल्या अनेक हिताच्या उपक्रमाची माहिती दिली व त्या ईतर संघटनांनी राबवाव्यात असे आवाहन केले. 
आपल्या प्रास्ताविकात वसंत सबनीस म्हणाले की, आमच्या जिल्हा कार्यकरणीला चौथ्यादा निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचे मी धन्यवाद करतो. मी व माझे सहकारी पेन्शनर्सचे प्रश्न,समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. सूत्र संचलन नवनिर्वाचित सदस्या रजनी नागवंशी यांनी केले.
विलास जाधव यांनी उपस्थित पेन्शनर्स यांना मार्गदर्शन केले. नामदेव घुगे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात नवनिर्वाचित सदस्यांची नावे जाहीर करण्यात येऊन निवडणूक निर्णय अधिकारी श्री. तरटे यांच्या उपस्थितीत प्रमाण पत्र वितरित करण्यात आली. श्री व सौ. शेरे पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. वैजापूर शाखेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत व लईक अहमद यांनी अधिष्ठाता सुक्रे यांचा विशेष सत्कार केला. कन्नड शाखेचे अध्यक्ष कुंभकर्ण, सोयगावचे बाविस्कर व वैजापूर चे धोंडीराम राजपूत यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व कार्यकारिणीचा सत्कार केला. 
या सभेत केंद्र कर्मचारी प्रमाणे वैद्यकीय अनुदान मिळावे, अंशराशिकरण बारा वर्षांपासून करावे, राज्यातील पेन्शनर्सची थकीत देयके त्वरित मंजूर करून वितरित करावी व पेंशन दर महिन्याच्या पांच तारखेपर्यंत करावी, अशा मागण्या ही करण्यात आला.

Post a Comment

0 Comments