वैजापूर, ता.15 - वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील अकरा वर्षीय आराध्या भगवान चौधरी हिची 25 दिवसांच्या उपचारानंतर जीवनाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. रविवारी (ता.14) डिसेंबर रोजी रात्री मुंबई येथील बाई जेराबाई वाडीया रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचे दुःखद निधन झाले.
आराध्याच्या गंभीर आजारामुळे तिच्यावर मोठ्या खर्चाचे उपचार सुरू होते. आर्थिक अडचणींमुळे तिच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. समाजातून त्याला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच काही प्रमाणात मदत रक्कमही जमा होत होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते.
आराध्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून धोंदलगावसह संपूर्ण वैजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मदतीसाठी पुढे आलेल्या दात्यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
0 Comments