अहिल्यानगर, ता.04 - सद्याची लग्न पद्धती ही आपली जुनी संस्कृती मोडीत काढत आहे. मराठा समाज संस्कृतीला जपणे हे प्रत्येक समाज घटकाचे काम आहे. त्यापद्धतीने लग्न सोहळा करणे, तसेच स्वतःची व समाजाविषयीची निष्ठा बाळगणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड संस्थांनचे संचालक व राष्ट्रीय संत भास्करगिरी महाराज यांनी केले. यावेळी प्रमुख मराठा बांधव व विविध क्षेत्रातील प्रमुखांच्या उपस्थितीत 20 कलमी आचारसंहितेची शपथ घेतली.
अहील्यानगरमध्ये रविवारी (ता.03) मराठा समाज लग्न सभारंभ आचारसंहिता संमेलन पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भास्करगिरी महाराज बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डोंगरगण येथील जंगले महाराज शास्त्री होते. पद्मश्री पोपटराव पवार, आ.संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, उद्योजक एन बी. धुमाळ यांच्यासह मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते.
मराठा समाजाच्या लग्नात होणारा वारेमाप खर्च टाळावा, प्री - वेडिंग शूट, डीजे, हुंडा, सत्कार व भाषणे यांना फाटा द्यावा. लग्नानंतर मुलीच्या आईने थेट फोन करून मुलीच्या संसारातील हस्तक्षेप टाळावा.अशा मुद्यांचा समावेश असलेली 20 कलमी मराठा लग्न आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. संमेलनात संत - महंत आणि समाजाच्या विविध घटकांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समाजाच्या लग्नातील उधळपट्टी आणि चुकीच्या प्रथा पाडत असलेले विवाह सोहळे चर्चेत आले होते. त्याविरोधात समाज एकवटला असून, विवाह सोहळ्यासाठी आचारसंहिता तयार करण्यात येत आहे.
लग्नसोहळा तीनशे ते पांचशे लोकांच्या उपस्थितीत व्हावा, प्री- वेडिंग प्रकार बंद करावा, केलाच तर तो लग्न सोहळ्यात दाखवू नये, लग्न वेळेवरच लावावे, लग्नात डीजे नको, पारंपरिक वाद्य, लोककलावंत यांना संधी द्या, कर्ज काढून खर्च करू नये, नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्याना पायबंद घालावा, वरमाला घालताना नवरा - नवरीला उचलू नये, लग्नात फक्त वधू पिता आणि वर पिता यांनीच फेते बांधावेत, पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत, प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने , गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत, देखावा करू नये असे नियम करण्यात आले आहेत. सुकाणू समिती तयार करण्यात आली असून, ती यावर देखरेख ठेवणार आहे.
0 Comments