news today, गोदावरीच्या पाण्याचा श्रीक्षेत्र सराला बेटला वेढा ; बेटावरील संपर्क तुटला

बेटावरील लोक आणि जनावरे सुरक्षित ; कुठलेही नुकसान नाही - महंत रामगिरी महाराज 

वैजापूर, ता.30 - गेले काही दिवस महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या मान्सूनच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भात मोठे संकट उभे केले आहे. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणं भरली असून धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून गोदावरी नदीला मोठा पूर आला असून या महापुराचा थेट फटका गोदावरीच्या मध्यभागी असलेले प्रसिद्ध श्रीक्षेत्र सरला बेटाला बसला आहे. श्रीक्षेत्र सराला बेटाला सध्या पाण्याने चारी बाजूंनी वेढा घातला आहे..यामुळे बेटावरील संपर्क तुटला आहे.

सुदैवाने बेटावरील लोक आणि जनावरं सुरक्षित असल्याची माहिती महंत रामगिरीजी महाराज यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बेटामध्ये शंभर विद्यार्थी, 250 गायी, 30 अंध व्यक्ती, 50 शेती कामगार आणि 40 महाराज मंडळी राहत असून सर्वजण सुरक्षित आहेत. तसेच मंदिर परिसरालाही पूराचा मोठा फटका बसलेला नाही.

दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनीही प्रशासनाशी समन्वय साधून सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाडा आणि विदर्भात अजूनही पावसाची संततधार सुरू असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गोदावरी नदीच्या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments