युवकांनी देशसेवेला प्रथम प्राधान्य द्यावे - विंग कमांडर देवेंद्र औताडे
विंग कमांडर देवेंद्र बाबासाहेब औताडे यांचा गौरव करताना डॉ.दिनेश परदेशी, आप्पासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील ठोंबरे
वैजापूर ता.15 - वैजापूर तालुक्याचे भूमिपुत्र, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी सहकार मंत्री स्व.विनायकराव पाटील यांचे नातू (कन्येचे चिरंजीव) विंग कमांडर (भारतीय वायुसेना) देवेंद्र बाबासाहेब औताडे यांनी ऑपेशन 'सिंदूर' मध्ये अतुलनीय शौर्य दाखवून जे धाडसी कार्य केले त्याबद्दल भारत सरकारने त्यांना "स्वातंत्र्य दिनी" राष्ट्रपती यांच्याहस्ते शौर्य पदक देऊन जो गौरव केला. त्या पार्श्वभूमीवर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात देवेंद्र औताडे यांचा जिल्हा बँक संचालक डॉ. दिनेश परदेशी यांच्याहस्ते सोमवारी (ता.15) स्मृती चिन्ह, गौरव पत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
अविवेकी विचारावर मात म्हणजे शौर्य ' - विंग कमांडर देवेंद्र औताडे
शौर्य म्हणजे केवळ शत्रूला यमसदनी धाडणंच नव्हे तर अविवेकी विचारावर विवेकाने मात करणं म्हणजेच शौर्य. काबाडकष्ट करून असंख्य हालअपेष्टा सहन करुन आपल्या मुलाबाळांच्या उज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या त्या मातापित्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं म्हणजे शौर्य, एवढेच नव्हे तर अन्याय अत्याचाराच्या विरोधात कणखर भूमिका घेणं म्हणजे शौर्य होय असं प्रतिपादन ऑपरेशन सिंदूर मध्ये अतुलनीय शौर्य गाजविणारे विंग कमांडर देवेंद्र औताडे यांनी विनायकराव पाटील महाविद्यालयाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी केले.ऑपरेशन सिंदूर मध्ये दैदिप्यमान कामगिरी केल्याबद्दल नुकतेच भारत सरकारने विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा शौर्य पुरस्कार देऊन गौरव केला आहे त्यांचा सत्कार समारंभ शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या विकास समितीचे प्रमुख अप्पासाहेब पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक डॉ दिनेश परदेशी, वैजापूर मर्चंट बॅकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती यांची उपस्थिती होती. विंग कमांडर देवेंद्र औताडे यांनी ऑपरेशन सिंदूर मधील आपल्या भारतीय सैन्यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगून विद्यार्थ्यांना जीवनात प्रगती करुन यश संपादन करण्याचे आवाहन केले.
प्राचार्य डॉ.शिवाजीराव थोरे यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर मध्ये पराक्रम गाजवून देशाची मान उंचावलेले विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा सत्कार आमच्या महाविद्यालयाच्यावतीने होत आहे ही आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब असून हा क्षण आमचा आनंद द्विगुणित करणारा आहे. तर डॉ दिनेश परदेशी यांनी विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा आजचा हा सत्कार समस्त वैजापूरवासियांसाठी भाग्याचा दिवस असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची विंग कमांडर पदापर्यंतची घोडदौड निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे यांनी आपल्या मनोगतात म्हटले. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होऊन प्रशासकीय पद न घेता पायलट होऊन प्रत्यक्ष शत्रूशी दोन हात करण्याची मानसिकता ठेऊन पायलट पदाची निवड करण्याची विंग कमांडर देवेंद्र औताडे यांची जिगर ही खरंच अद्वितीय असल्याचे बाळासाहेब संचेती यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षीय समारोपात अप्पासाहेब पाटील यांनी विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचे शौर्य येणाऱ्या असंख्य पिढीला प्रेरणादायी असल्याचे म्हटले.
अंजली जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रमोद जगताप, देवदत्त पवार, उल्हास ठोंबरे, हाजी अकिल शेख, प्रशांत सदाफळ उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ सुनील डहाळे यांनी तर आभार प्रा.निमसे यांनी मानले. वैजीनाथ जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने जेष्ठ नागरिक तथा माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत, उत्कर्ष महिला जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने अंजलीताई जोशी, संध्या ठोंबरे यांनी देवेंद्र औताडे यांचा सत्कार केला.
या प्रसंगी मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष उल्हास पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज ठोंबरे, प्रवीण ठोंबरे,पी.वाय.चव्हाण, सेवानिवृत्त प्रा.जवाहर कोठारी, प्रा.के.ए.मगर, रामकृष्ण साठे, उपप्राचार्य श्री.परदेशी, सुधाकर पाटील ठोंबरे, संतोषी लालसरे, प्रशांत कंगले, मकरंद कुलकर्णी, भानुदास धामणे, अजय राजपूत, अशोक बोराडे, धोंडीरामसिंह ठाकूर यांच्यासह शहर व तालुक्यातील नागरिक, महिला, कॉलेजचे विद्यार्थी, माळीवाडा (ता.श्रीरामपूर) चे ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
.
0 Comments