news today, चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्याची धमकी ; घाबरलेल्या शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 पैठण तालुक्यातील खादगाव येथील घटना...


पाचोड, ता.18 / प्रतिनिधी - खादगाव- खेर्डा रस्त्याच्या कामासाठी संबंधीत ठेकेदाराने खोदलेल्या दुतर्फा नालीद्वारे पावसाचे पाणी शेतात येऊन पिकाची नासाडी होत असल्याने शेतात येणारे पाणी बंद करण्यासाठी शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीन्वये घटनास्थळ पाहणी व पंचनामा करण्यासाठी आलेल्या तलाठी व मंडळाधिकाऱ्याने प्रतिवादी शेतकऱ्याशी संगनमत करून उलट तक्रारदार शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने अपमानित झालेल्या संबंधित तक्रारदार शेतकऱ्याने पंचनामा सुरू असतांना अधिकारी - कर्मचारी व ग्रामस्थासमोरच विहारीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना खादगाव (ता.पैठण) येथे मंगळवारी(ता.16) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. मयताच्या नातेवाईकांनी मंडळाधिकारी, तलाठी व प्रतिवादी शेतकऱ्याविरुद्ध जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उत्तरणीय तपासणी व अंत्यसंस्कारास हरकत घेत पाचोड (ता.पैठण)च्या ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या मांडला.

.               
                       मयत संजय कोहकडे 

यासंबंधी अधिक माहिती अशी, खादगाव - खेर्डा रस्त्याचे काम सुरू असून या कामासाठी ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूने जेसीबीद्वारे नाल्या खोदल्या. या रस्त्यालगत खादगाव येथील संजय शेषराव कोहकडे (वय 45 वर्ष) यांची शेतजमिन आहे. ठेकेदाराने नाल्या खोदल्याने पावसाचे पाणी नाल्याद्वारे थेट संजय कोहकडे यांच्या शेतात येऊन पिकाचे नुकसान होऊ लागल्याने व त्यांस आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतात रस्ता तयार करून शेतकरी कोहकडे यांनी बालानगरच्या महसूल मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे व ग्राम महसुल अधिकारी लक्ष्मीकांत गोजरे यांचेकडे तक्रार करून शेतात येणारे पाणी बंद करण्यासंबंधी कारवाई करण्याची विनंती केली होती. मंगळवारी (ता.16) बालानगरच्या महसुल मंडळाधिकारी शुभांगी शिंदे व खादगाव सज्जाचे तलाठी लक्ष्मीकांत गोजरे, ग्रामस्थ, संबंधीत शेतकरी त्या जमिनीत चौकशीसाठी आले. पंचनामा सुरू असताना प्रतिवादी शेतकरीही घटनास्थळी आले व तलाठी व मंडळाधिकारी यांचेशी त्यांची काहीतरी कुजबूज झाली व मंडळाधिकारी व तलाठयांनी तक्रारदार शेतकरी संजय कोहकडे यांस चारचौघांत चांगलीच कानउघडणी करीत त्यांस अपमानित केले व त्यास विनाकारण अडथळा केल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. शेतकरी संजय कोहकडे हे संबंधिताच्या धमकीमुळे अपमानित झाले व त्यांनी पंचनामा सुरू असतानाच स्वतःच्या विहिरीत संबंधित अधिकारी, ग्रामस्थांसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांस पोहता येत नसल्याने त्यांचा मदतीपूर्वीच मृत्यू झाला. 

या घटनेची पाचोड पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने संजय कोहकडे यांचा मृतदेह विहीरीबाहेर काढून उत्तरणीय तपासणीसाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी मयत संजय कोहकडे यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. अधिकाऱ्याच्या चुकीमुळे श्री कोहकडे यांचा बळी गेल्याने नातेवाईक आक्रमक झाले. त्यांनी जोपर्यंत मंडळधिकारी,तलाठी व संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उत्तरीय तपासणी करून देणार नाही अन् मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा घेतला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मयताच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत रुग्णालयासमोर गर्दी केली. अखेर पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडीत, पोलिस उपनिरीक्षक राम बारहाते, पोलिस नाईक रविंद्र आंबेकर यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन मृताच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी परवानगी दिली. रात्री सव्वासात वाजेपर्यंत उत्तरणीय तपासणीचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. अंत्यसंस्कारानंतर बुधवारी (ता.17) नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments