मुंबई, ता.20 - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच डिसेंबर अखेरीस राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितींच्या निवडणुका होतील. अखेरच्या टप्प्यात 15 ते 20 जानेवारी दरम्यान 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
जानेवारीअखेर सर्व निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार 20 जानेवारीपूर्वी सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. जानेवारीच्या अखेरपर्यंत्त सर्व निवडणुका पूर्ण होऊन स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये लोकप्रतिनिधींचे राज्य सुरू होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी देखील काम सुरू केले आहे.
0 Comments