news today, डायल 112 वर फेक कॉल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर, ता .20  - डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर फेक कॉल करून पोलिस यंत्रणेला खोटी माहिती देणे एकाला चांगलेच भोवले आहे.  पोलिसांना खोटी माहिती दिल्याने त्याच्याविरुद्ध  वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मदन शिवाजी ठोंबरे (रा.भायगाव ता.वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 19 ऑक्टोबर दरम्यान पोलिस कर्मचारी शुभम रावते हे डायल  112 या आपत्कालीन सेवेवर कार्यरत होते. दरम्यान शनिवारी सायंकाळी सात वाजता वैजापूर तालुक्यातील भायगाव येथील मदन शिवाजी ठोंबरे याने डायल 112 या क्रमांकावर कॉल करून तालुक्यातील जरुळ फाटा येथे एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती दिली. या माहितीवरून कर्मचारी किरण रावते यांच्यासह पथक मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी तत्काळ दाखल झाले. यावेळी पोलिसांनी कॉलर मदन ठोंबरे याच्यासह परिसरातील नागरिकांना अधिक विचारपूस केली असता अशी कुठलीही बाब निदर्शनास आली नसल्याचे नागरिकांनी त्यांना सांगितले. याशिवाय मदन याने कॉल करून त्या ठिकाणी रुग्णवाहिका देखील बोलावून घेतली. कुठलीही अत्यावश्यक परिस्थिती उदभवलेली नसताना पोलिस यंत्रणेला व्यस्त ठेवल्याने अखेर मदन ठोंबरे याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments