news today, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर 'अर्धनग्न' आंदोलन

अनुदान न मिळाल्याने चटणी भाकर खाऊन केला सरकारचा निषेध...

छञपती संभाजीनगर, ता.22 - दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसाभरपाईची रक्कम जमा न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी (ता.21) जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी चटणी भाकरी खाऊन सरकारचा निषेध नोंदविला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांत चांगलीच झटापट झाली.

छञपती संभाजीनगर जिल्हयात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला आहे. नुकसानीचे पंचनामे करून सरकारने मोठे पॅकेजही जाहीर केले. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसाभरपाईची मदत जमा करण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र अद्याप शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे. याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न होऊन चटणी भाकरी खात दिवाळी साजरी करण्याचे आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. आंदोलनादरम्यान पोलीस आणि अंदोलकांमध्ये किरकोळ झटापटही झाली. 

या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, ज्ञानेश्वर मुळे, दिनकर पवार, प्रकाश बोरसे, राजू बोंगाणे, शिवाजी धरफळे, यादवराव कांबळे, गणपतराव खरे, पुरण सनान्से यांच्यासह शेतकरी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments