news today, अत्याचाराला कंटाळून डॉक्टर तरूणीची आत्महत्या

सातारा, ता.24 - सातारा जिल्हयातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉक्टर महिला डॉ.संपदा मुंडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन अशी तक्रार त्यांनी यापूर्वीच रुग्णालयाच्या वरिष्ठांकडे दिली होती. तरीही त्याची दखल घेतली गेली नाही 
म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डॉ.संपदा मुंडे यांनी त्यांच्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात पीएसआय गोपाल बदने व पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत बनकर या दोघांनी त्यांच्यावर अत्याचार व मानसिक छळ केल्याचा आरोप केला असल्याची चर्चा आहे.

                                                          डॉ. संपदा मुंडे

पीएसआय गोपाल बदने तात्काळ निलंबित .. 

या घटनेची दखल घेऊन पीएसआय गोपाल बदणे यास तात्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे - आ.रोहित पवार 

पीएसआय गोपाल बदने याने अत्याचार केल्याचं तर पोलीस प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचं हातावर लिहून ठेवत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव आणला जात असल्याचं कळतंय आणि हे अत्यंत भयानक आहे. या घटनेमुळं गृहखात्याची अब्रू तर वेशीवर टांगली गेलीच पण पोलिसच असा अत्याचार करत असतील तर महिलांनी न्याय मागण्यासाठी जायचं कुठं? असा प्रश्न निर्माण होतो. राज्यातील सगळेच पोलीस वाईट नाहीत पण अशा नराधम पोलिसांमुळं चांगलं काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या नावाला काळीमा लागतो. या एकूणच प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जनतेचे रक्षक असूनही भक्षक बनलेल्यांवर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी आ.रोहित पवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments