मुंबई, ता.30 - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे दुबार असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी अंतिम करण्याची मुदत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकापूर्वी मतदार याद्यांमधील दुबार नावांचा घोळ मिटल्यानंतरच अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची प्रभाग रचना, गट गणांचे आरक्षण ,मतदार यादी आणि मतदार केंद्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे.या प्रारूप मतदार यादीत काही मतदारांची नावे दुबार असल्याच्या तक्रारी राज्यभरातून प्राप्त झाल्या होत्या. मतदार यादीत गोंधळ असल्याचा आरोप होत असल्याने या मतदार याद्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदार याद्यांविषयी ओरड झाल्याने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदार यादी अंतिम करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात 27 ऑक्टोबर रोजी पत्र काढले असून मतदार यादी अंतिम करण्याच्या कार्यक्रमात बदल केला आहे. त्यानुसार 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणांच्या छापील मतदार यादी अधिप्रमानित करण्याची तारीख आहे. याच दिवशी छापील मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्या बाबतची सूचना प्रसिध्द केली जाईल. तसेच 12 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार 27 ऑक्टोबर ही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुदत होती.
मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश ...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमधील घोळ व चुका समोर आणल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. अशा दुबार नाव असलेल्या मतदारांना शोधून त्यांच्याकडून कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाणार आहे.
महाविकास आघाडी तसेच मनसेने मतदार याद्यातील घोळावरून आवाज उठवला आहे.मतदार यादीत दुरुस्ती केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. यासंदर्भात 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्याचे विरोधी पक्षांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार नावाबाबत उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत.
 
0 Comments