हसन सय्यद
------------------------
लोणी खुर्द, ता.30 -अतिवृष्टीमुळे वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना मुख्य रस्त्यांशी जोडणारे पूल - पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी पूल खचले आहेत. या पार्श्वभूमीवर छावा संघटनेतर्फे पुलांची उंची वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष किशोर मगर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनासह संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
उपविभागीय अभियंता रोडगे यांना निवेदन देताना छावा संघटनेचे अध्यक्ष किशोर मगर..
छावा संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शिऊर बंगला-मालेगाव रोडला जोडणारे तलवाडा - सावखेड खंडाळा रोड, मालेगाव रोड (शिऊर), वाकला, जातेगाव, लोणी-बोललठाण, - कविटखेडा-बोलठाण, तलवाडा-चिकटगाव, - बाभूळगाव बु. बाभूळगाव खुर्द, चिकटगाव-पाराळा, मालेगाव-बोरसर आदी रस्त्यांवरील पुलांची उंची वाढवण्याची गरज आहे.
27-28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील संपर्क व्यवस्था कोलमडून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. मागील दोन दिवसात डोंगरथडी भागातील कविटखेडा आणि अंचलगाव येथील दोन लहान मुलांना पुलांच्या पाण्याचा अंदाज न आल्याने जीवाला मुकावे लागले. दोन निष्पाप लहान मुलांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर छावा संघटनेने ही मागणी केली आहे.
छावा संघटनेने.तहसीलदार सुनील सावंत यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, रस्त्यांवरील पूल हे रक्तवाहिन्यांप्रमाणे आहेत. त्यांच्या उंची वाढविण्यामुळे शाळकरी विद्यार्थी, शेतमाल, दूध व्यवसाय, वैद्यकीय सेवा, जनावरांचा चारा व अन्य आवश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत होईल. नायब तहसीलदार सूरज कुमावत यांनी हे निवेदन स्वकाले. ग्रामीण भागातील संपूर्ण पुलांची माहिती घेऊन लवकरच संबंधित विभागाला सूचना करण्यात येईल त्यांनी असे सांगितले.
या वेळी योगेश सोनवणे, वाघ सर, ज्ञानेश्वर तुरकणे, संतोष जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान, उपविभागीय अभियंता वैजापूर अ.च.रोडगे यांनी आठ दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. पंधरा दिवसांत पुलांची उंची वाढविण्या संदर्भात आवश्यक निर्णय व कार्यवाही झाली नाही, तर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही छावा संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे..
0 Comments