मुंबई, ता.02 - मुंबईसह राज्यातील दुकाने, मॉल, हॉटेल्स, सिनेमागृहे आणि मनोरंजनाची ठिकाणे आता 24 तास खुली ठेवता येणार आहेत तसा शासन आदेश बुधवारी (ता.01) जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे आता दुकाने, मॉल, हॉटेल दिवस रात्र सुरू ठेवता येणार आहेत.मात्र या निर्णयातून मद्यविक्री दुकाने, बार व परमिट रूम यांना वगळण्यात आले आहे.
चोवीस तास दुकाने खुली राहणार....
मद्याची दुकाने आणि इतर आस्थापनांमध्ये गल्लत होत असल्याने पोलिसांकडून इतर दुकानेही रात्रीची खुली ठेवण्यास प्रतिबंध केला जात होता.त्यामुळे अधिक स्पष्टता आणण्यासाठी हा आदेश काढण्यात आला. यानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनिमय) अधिनियम 2017 च्या कलम 2(2) मध्ये दिवसाची व्याख्या मध्यरात्रीपासून सुरू होणारा चोवीस तासांचा कालावधी अशी करण्यात आली आहे.
उद्योग विभागाने या निर्णयाचा शासन आदेश जारी केला आहे.
कर्मचाऱ्याला एक दिवसाची सुटी मिळणार ...
त्या आदेशातील काही कलमांच्या अंतर्गत आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस खुल्या ठेवता येतील.मात्र त्यासाठी अट घालण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून चोवीस तास सलग विश्रांती मिळेल अशी साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या अधिनियमानुसार, मध्यरात्रीपासून पुढील दिवस सुरू होणार आहे.24 तासांचे मोजमाप मध्यरात्री 12 वाजल्यापासून केले जाणार आहे.त्यानुसार नियमांची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.
0 Comments