news today, अतिवृष्टीचा फटका ! दसऱ्याला ग्राहकांच्या खिशाला काही ठिकाणी कात्री; तर काही ठिकाणी कवडी मोल भाव ?


हसन सय्यद 
--------------------------
लोणी खुर्द, ता.02 - शारदीय नवरात्रोत्सवाचा समारोप होत असून, आज दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर लोणी खुर्द (ता.वैजापूर) येथे फुलबाजारात झेंडूची आवक कमी झाली . अतिवृष्टीचा फटका दसऱ्याला ग्राहकांच्या खिशाला काही ठिकाणी कात्री तर काही ठिकाणी कवडी मोल भाव झेंडू विक्रीला मिळाला. 
 प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या तीन्ही सणांमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. विशेषतः झेंडूची मागणी दसऱ्याला उच्चांकी असते. त्यामुळे शेतकरी या कालावधीत झेंडूची तोड करून विक्रीसाठी बाजारात पाठवतात.
    
 यंदा अतिवृष्टीमुळे झेंडूच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. बुधवारी सायंकाळी पावसाची सरी बरसल्याने फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने ओल्या झेंडूंचे प्रमाण सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. बुधवारी बाजारात ओल्या झेंडूला प्रति किलो ४० ते ५० रुपये दर मिळाला, तर गुरुवार रोजी सकाळी लोणी खुर्द येथे चांगल्या प्रतीच्या सुक्या झेंडूला १०० ते १२० रुपये दर मिळाले. यामुळे शेतकऱ्यांना सुक्या झेंडूमध्ये चांगला फायदा होत आहे.
 दसऱ्यानिमित्त झेंडूचे दर नेहमीपेक्षा जास्त मिळतात, म्हणूनच अनेक शेतकरी फुले राखून ठेवतात आणि योग्य वेळीच बाजारात पाठवतात. मोहंमद सैय्यद व्यापारी सांगतात की, आज गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत किरकोळ बाजारात सध्या उत्तम प्रतीच्या झेंडूला १०० ते १५० रुपये प्रति किलो दर मिळण्याची शक्यता आहे.
   सैय्यद मोहंमद या व्यापाऱ्यांनी सांगितले की, यंदा पावसामुळे उत्पादन घटले आहे. त्यामुळे ओल्या फुलांची संख्या जास्त असून, सुक्या फुलांना नेहमीपेक्षा दुप्पट दर मिळत आहेत. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होतो आहे.
      एकंदरीत, पावसाच्या फटक्याने फुलांची प्रतवारी खालावली असली तरी सणांच्या उत्साहामुळे आणि मागणीमुळे चांगल्या प्रतीच्या झेंडू व इतर फुलांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी दोघांसाठी ही हा हंगाम आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments