news today, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी घोषित करावी या मागणीसाठी स्मशानभूमीत आमरण उपोषण

वाल्मिक क. जाधव 
---------------------------------------

शिऊर, ता .09 - सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या नुकसानीसाठी सरसकट मदतीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषित करावी या मागणीसाठी जनक्रांती योद्धा अजय पाटील साळुंखे यांनी मंगळवार (ता.07) ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

विशेष बाब म्हणजे साळुंखे हे वैजापूर तालुक्यातील टुणकी येथील स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या मंडपात उपोषणाला बसले आहेत. दरम्यान उपोषणाला दोन दिवस उलटून गेले तरी ना पोलीस, ना एकही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन उपोषण सोडवण्याचा कोणताही प्रयत्न करताना दिसलेले नाहीत.

या उपोषणाबाबत बोलताना साळुंखे म्हणाले, “शेतकरी, कष्टकरी, कामगार यांची अवस्था अतीशय दयनीय झाली असून आज ते मरणाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. सरकार चंद्रावर जाण्याची भाषा करत असताना, शेतकरी मात्र स्मशानभूमीत उपोषण करतो आहे. हे अत्यंत शोकांतक असून, सरकारने तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करावी आणि जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी.” असे प्रखर मत त्यांनी दै. पोलीस न्युज प्रतिनिधींशी बोलताना मांडले.

दरम्यान बुधवारी (ता.08) रोजी या उपोषणाला शिऊर येथील शेतकरी समितीच्यावतीने एक शिष्टमंडळाने भेट देऊन साळुंखे यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहून उपोषण सुरूच ठेवले आहे.

यावेळी उपोषणस्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये अर्चना साळुंखे, तुषार निकम, बाळा पाटील जाधव, मच्छिंद्र जाधव, सौरभ जाधव, बाळू पवार यांच्यासह महिला व पुरुष ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments