बौध्द भिक्खूंचा एकतेचा संकल्प ...
वैजापूर, ता.06 - जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले महाबोधी महाविहार आंदोलन हे केवळ विहाराच्या ताब्याचे नव्हे, तर संपूर्ण बौद्ध समाजाच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे, एकशे सदोतीस वर्षांपासून सुरू असलेले हे आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवूच. असे प्रतिपादन बोधगया आंदोलनाचे प्रणेते भन्ते विनाचार्य यांनी केले. तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेले जागतिक वारसा स्थळ असलेल्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे व बिहार मंदिर अधिनियम 1949 रद्द करण्यात यावा या मागणीसाठी वैजापूरात सोमवारी (ता.6) भव्य मोर्चा काढण्यात आला. ज्यात बौद्ध समाज बांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. या मोर्चाचे नेतृत्व बोधगया आंदोलनाचे प्रणेते पुज्य भन्ते विनाचार्य यांनी केले.
सकाळी अकरा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर सभा घेण्यात आली. त्याप्रंसगी भन्ते विनाचार्यानी मत मांडले ते पुढे म्हणाले की, भारतीय भिक्खू संघाच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाने राष्ट्रीय स्तरावर गती घेतली असे सांगून आजच्या या आंदोलनाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक भन्ते आनंद सुमन सिरी यांनी केले. त्यात त्यांनी बोधगया आंदोलनाची पार्श्वभूमी सांगताना नमूद केले की, हे आंदोलन म्हणजे अन्यायाविरुद्धची आणि बौद्ध समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. सामाजिक व धार्मिक दृष्ट्या आपण एकत्र आलो पाहिजे. देशभरातील भिक्खू व अनुयायी या चळवळीत सहभागी होत आहेत, कारण महाबोधी महाविहार हे बौद्धांचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक केंद्र आहे.आपण संघटित राहूनच आपले अस्तित्व मजबूत केले पाहिजे. तसेच येत्या 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
या प्रसंगी भन्ते खंतिको, भन्ते फ्राअजान थेरो, भिक्खू संघप्रिय थेरो, भन्ते अनुकीर्ती, भन्ते भारद्वाज आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या शेवटी पुज्य भिक्खू संघाला जेतवन बुद्ध विहारात चिवरदान तथा धम्मदान देण्यात आले. याप्रसंगी महाबोधी महाविहार बचाव समिती सदस्यांसह समस्त बौद्ध समाज बांधवांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
0 Comments