गंगथडी भागातील नुकसानग्रस्त भागाची दानवे यांच्याकडून पाहणी
वैजापूर, ता .01 - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतमाल, पिके, जनावरांचा चारा व घरांची हानी झाली आहे. अतोनात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी (ता.01) वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या नागमठाण, बाजाठाण, अव्वलगाव, चेंडुफळ, शनि देवगाव, चांदेगाव या गावातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
गोदावरी काठच्या गावांना अंबादास दानवे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
झालेल्या अतिवृष्टीत सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिके उध्वस्त झाली, शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. सरकारने तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करून ती प्रत्यक्ष खात्यात जमा करावी. शेतकऱ्यांच्या मदतीत कोणत्याही प्रकारचा विलंब अथवा अन्याय होऊ देणार नाही. शिवसेना रस्त्यावर उतरून लढेल, असा इशारा दानवे यांनी राज्य सरकारला दिला.
शेतकऱ्यांना मदत ही केवळ आश्वासनापुरते राहता कामा नयेत. अतिवृष्टीग्रस्तांना सर्वतोपरी मदत मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे. केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन विशेष मदत जाहीर करावी. तसेच पंचनामे त्वरीत पूर्ण करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत दिली पाहिजे. अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नेहमीच लढा दिला आहे.आज शेतकरी संकटात असताना शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकऱ्यांच्या जिवनाशी खेळ करणारे निर्णय आम्ही सहन करणार नसल्याचे दानवे म्हणाले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभा संघटक मनाजी मिसाळ, उपतालुका प्रमुख ॲड रमेश सावंत, नंदकिशोर जाधव, गणेश तांबे,अक्षय साठे, वाल्मीक गिरी यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ व उपस्थित होते.
0 Comments