news today, पंचगंगा देणार ऊसाला 3150 रुपये भाव - चेअरमन प्रभाकर शिंदे


कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते शुभारंभ 

वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते शनिवारी उसाची मोळी टाकून करण्यात आली.

वैजापूर, ता.02 - .प्रतिनिधी - चालू गळीत हंगामात पंचगंगा शुगर अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड हा साखर कारखाना चांगल्या प्रतीच्या उसाला प्रतिटन 3 हजार 150 रुपये भाव देईल. तसेच त्याखालोखाल असलेल्या इतर जातीच्या उसाला 3 हजार 50 रुपयांचा भाव देण्यात येईल अशी घोषणा पंचगंगा कारखान्याचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी केली. या घोषणेचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे. त्यामुळे कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. पहिल्या गळीत हंगामात या कारखान्याने सुमारे तीन लाख 18 हजार टन उसाचे गाळप केले होते.
    
अल्पवधीतच तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी वरदान ठरलेल्या महालगाव येथील पंचगंगा साखर कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाची सुरुवात सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज व मार्गदर्शक उत्तमराव शिंदे यांच्या हस्ते शनिवारी ऊसाची मोळी टाकून करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात चेअरमन शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाला वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश पाटील बोरनारे, नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे, कुंडलिक माने, शिवाजी बनकर, भाऊसाहेब झिंजुर्डे, प्रकाश शेळके, बाळासाहेब कापसे, मधुकर महाराज, मंगेश गायकवाड या मान्यवरांची उपस्थिती होती.
    
शिंदे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कारखाना टप्प्याटप्प्याने विविध प्रकल्प सुरु करत असून लवकरच शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत वाजवी दरात देण्यात येणार आहे. याशिवाय कारखान्याच्या गेटवर मका खरेदी करण्यासाठी मोफत आर्द्रता तपासणी करण्यात येईल व मकाला कमीत कमी एक हजार पाचशे रुपये भाव देण्यात येईल. येत्या काळात मका व मोलाईस पासून मद्य बनवण्याचे प्रकल्प (डिस्टीलरी) सुरु करण्यात येतील. 
     चांगल्या प्रतीच्या व विशिष्ट जातीच्या उत्तम उतारा देणाऱ्या उसाला तीन हजार 150 रुपये भाव देण्याची घोषणा त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, उसाचे योग्य वजन झाले पाहिजे व शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे असे सांगत कुणी राजकीय कारणासाठी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकणार असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू असा इशारा शिंदे यांनी दिला.
महंत रामगिरीजी महाराज, आमदार बोरनारे, आमदार लंघे, बाबासाहेब जगताप, अविनाश गलांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

स्वार्थी माणसाला उतरती कळा ...

या जगात माणसाला स्वार्थ आणि परार्थ दोन्ही करावे लागते. परंतु निव्वळ स्वार्थ साधणारा माणूस इतरांची फसवणूक करत असतो. निव्वळ स्वार्थ आणि निव्वळ परार्थही ठीक नाही. कारण यातून नुकसानच होते. तथापि स्वार्थ साधताना परार्थाशी सांगड घातल्यास यश मिळते असा उपदेश महाराजांनी केला.

फोटो: वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते शनिवारी उसाची मोळी टाकून करण्यात आली.

Post a Comment

0 Comments