news today, नगरपालिका निवडणुकीची घोषणा येत्या 48 तासात होण्याची शक्यता

बुधवारी (ता.05) निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ; त्याच दिवशी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता 

मुंबई, ता.03 -  प्रभाग रचना, इतर मागासवर्गीयांचे आरक्षण तसेच अन्य मुद्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राज्य निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा येत्या 48 तासात होण्याची शक्यता आहे. तर 15 ते 20 जानेवारी दरम्यान मुंबईसह सर्व महापालिकांसाठी मतदान घेण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी (ता.05) निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलवली असून त्याचदिवशी नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होतील,असे सूत्रांनी सांगितल

नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरच्या महिन्यात मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदत कार्यात गुंतलेली आहे.त्यामुळे या निवडणुका डिसेंबर महिन्यात होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 ची मुदत दिली आहे.

मतदानानंतर दुसऱ्यादिवशी मतमोजणी ...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हाती घेतली जाईल.कारण तिन्ही टप्प्यातील निवडणुकीची एकत्र मोजणी शक्य नाही. निवडणूक यंत्रणेवरील ताण आणि मर्यादित मनुष्यबळ लक्षात घेता प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर दुसऱ्यादिवशी मतमोजणी होईल.असे सूत्रांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments