जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश...
छत्रपती संभाजीनगर, ता.14- जिल्ह्यातील ज्या नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता सुरु आहे, त्याक्षेत्रातील शस्त्रपरवानाधारक 88 पैकी 76 जणांना 24 तासांत आपली शस्त्रे नजीकच्या पोलीस स्टेशनला जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
यासंदर्भात आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, पोलीस निरीक्षक संजय देशमुख आदी उपस्थित होते. सद्यस्थितीत निवडणूक आचारसंहिता सुरु असलेल्या सहा नगरपालिका व एक नगरपंचायत क्षेत्रात एकूण 88 व्यक्ती शस्त्रपरवानाधारक आहेत. त्यापैकी 76 लोकांना शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्य 12 व्यक्ती ज्यांना त्यांचे शासकीय कर्तव्य म्हणून शस्त्र बाळगावे लागते त्यांचा समावेश आहे. तरी या 76 व्यक्तिंनी दि.15 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत आपल्याकडील शस्त्र नजिकच्या पोलीस स्टेशनला जमा करावे,असे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून शस्त्र जमा केले जात आहेत.
0 Comments