वैजापूर, ता.04 - अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत दिवाळी आधी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. मात्र वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप देखील मदत मिळाली नसल्याने शेतकरी मदतीची वाट पाहत आहे.
सप्टेंबर महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एक लाख 21 हजार 187 शेतकऱ्यांचे एक लाख 7 हजार 780 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात एक लाख 6 हजार 358 हेक्टर जिरायती, 744 बागायती, तर 778 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, शासनाच्या निकषानुसार मदतीसाठी 93 कोटी 24 लाख 96 हजार रूपयांची गरज आहे. त्यानुसार याद्या व मदतीच्या रकमेचा अहवाल महसूल प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्याप रक्कम प्राप्त झाली नाही.त्यामुळे मदत वाटप रखडली आहे.
सप्टेंबर महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक घरांची पडझड झाली. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. तालुक्यात प्रशासनासह आजी माजी लोकप्रतिनिधींसह विविध पक्षांच्या नेत्यांनी फिरून नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. प्रशासनाच्या सूचनेनुसार पंचनामेही केले. पंचनामे पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा मदतीकडे लागल्या होत्या.
दिवाळी आधी मदत मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शासनाकडून निधी मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांची ऐन सणासुदीत आर्थिक कोंडी झाली असून, मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
0 Comments