news today, दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या परराज्यातील दोघांना अटक ; वैजापूर पोलिसांची कारवाई

वैजापूर, ता.05 - दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या परराज्यातील टोळक्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून वैजापूर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी (ता.04)  रात्रीच्या ही कारवाई करण्यात आली. मोहमंद कैफ नजमोद्दीन (रा.उलेटा ता.फिरोजपुर जि. नुहु राज्य हरियाणा) आझाद इमरु खान  (रा. झारोकशी ता पुनहना जि. नुहु राज्य हरियाणा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, कार व रोकड असा एकूण चार लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील स्टेशन रोडलगत असलेल्या एसबीआय बँक (मोंढा शाखा) परिसरात हरियाणा राज्याची पासिंग असलेल्या स्विफ्ट गाडीत काही संशयित इसम आले असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना फोनवरून मिळाली. सदरची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलिस हवालदार अविनाश भास्कर, ज्ञानेश्वर मेटे, सागर विघे, लघाने यांचे पथक महितीतील ठिकाणी दाखल झाले. मात्र पोलिस आल्याची चाहुल लागताच वाहनात (एच.आर.93 बी. 6557) बसलेले सर्वजण स्टेशन रस्त्याने वाहन घेऊन सुसाट निघाले. यावेळी पोलिसांनीही शासकीय वाहन व दुचक्याने या वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान जरुळ फाटा येथे वाहन पोहचले. मात्र या ठिकाणी नागरिकांचा जमाव बघून दरोडेखोर पुन्हा माघारी फिरले व त्यांनी आपली कार वैजापूरच्या दिशेने वळवली. शहरात पोहचताच त्यांनी जीवनगंगा हाऊसिंग सोसायटीत सुसाट वाहन घुसविले.  वसाहतीच्या शेवट आघुर रोडलगत असलेल्या जेजुरकर वस्ती येथे त्यांनी वाहन सोडून पळ काढला. दरम्यान पोलिसांकडून दरोडेखोरांचा सुरू असलेला सिनेस्टाईल पाठलाग परिसरातील नागरिकांनी 'याची देहा याची डोळा अनुभवला' सदर कारमधील इसमांचा शोध घेणे कामी पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, नितीन नलवडे, युवराज पाडळे, नंदकुमार नरोटे, पोलिस हवालदार कुलदीप नरवडे, अनिल दाभाडे तसेच छञपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे, कासम शेख, पोलिस हवालदार प्रमोद पाटील, सचिन राठोड, बलविरसिंग बहुरे यांच्या पथकाने संशयित दरोडेखोरांचा वैजापूर शहर व परिसरात शोध सुरू केला. 

तालुक्यातील तिडी शिवारातील जिल्हा परिषद शाळेजवळ दोघेजण संशयितरित्या फिरत असल्याचा सुगावा उशिरा रात्री पोलिसांना लागला. पथकाने तिडी, मकरमतपुर शिवारात अंधारात संशयित दरोडेखोरांचा शोध घेतला. यावेळी  तिडी गावात जिल्हा परिषद शाळेजवळ दोन इसम संशयितरित्या वावरताना दिसून आले. पोलिस आल्याचे चाहुल लागल्याने त्यांनी तिथूनही पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव मोहमंद कैफ नजमोद्दीन (रा.उलेटा ता.फिरोजपुर जि नुहु राज्य हरियाणा) आझाद इमरु खान  (रा. झारोकशी ता पुनहना जि. नुहु राज्य हरियाणा) असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य 22 हजारांची रोकड, कार व चार लाख 87 हजार 7750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाई दरम्यान यांचे इतर तीन साथीदार पळ काढण्यात यशस्वी झाले. 
या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments