तुम्हाला लोकांनी घरी बसवलं' - आत्मपरीक्षण करा - खा. डॉ श्रीकांत शिंदे यांचा घणाघात
वैजापूर, ता. 06 - जे नोट चोरी करून थकले तेच आता वोट चोरीचा ढोल वाजत आहेत. लोकांनी तुम्हाला घरी बसवलं, कधीतरी आत्मपरीक्षण करा असा सल्ला कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह विरोधकांना दिला. विधानसभेत ज्या प्रकारे काम करून भरघोस मतदान मिळवले त्याच प्रकारे नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणूकीत काम करा व मिळवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना कार्यकर्त्यांचा सवांद मेळावा बुधवारी (ता.05) येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. ज्यांनी लोकांसाठी काहीच केले नाही काहीच केलं नाही त्यांनी लोकांसमोर जाऊन मतांचा जोगवा कशाला मागावा असा सवालही त्यांनी यावेळी केला.
वैजापूर शहरात बुधवारी छञपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तथापि निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपरिषदा नगरपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर केल्याने हा कार्यक्रम रद्द करून शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात डॉक्टर शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार संदिपान भुमरे, जालना विधानसभेचे आमदार अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश पाटील बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, जिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, सभापती रामहरी जाधव, तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉक्टर शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजातील सर्व घटकांसाठी केलेल्या कामाचा उहापोह केला. समाजातील एकही घटक असा नाही ज्याच्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काम केले नाही असे ते म्हणाले. वैजापूर शहराला शुद्ध पाणीपुरवठा यासह वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व जनता भिमुख कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त करीत उपस्थितांचे मने जिंकली. आमदार रमेश बोरनारे यांनी वैजापूर शहरासह विधानसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षात केलेल्या विकास कामाचा पाढा वाचला. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलो नसतो तर ही कामे झाली असती का असा प्रश्न विचारत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. काही झाले तरी येत्या नगरपरिषद निवडणुकीत वैजापूरची उमेदवारी महायुतीतून शिवसेनेलाच द्यावी अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी करत आमचा निरोप शिंदे साहेबांपर्यंत पोहचवावा अशी विनंती खासदार डॉक्टर शिंदे यांच्याकडे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
0 Comments