कॉपीराईट कायद्यांतर्गत रामदेव मोबाईल शॉपीसह चार दुकानदारांवर गुन्हा दाखल ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वैजापूर, ता.11 - छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता.10) वैजापूर शहरातील डेपो रोडवरील रामदेव मोबाईल शॉपीसह चार मोबाईल दुकानावर छापा टाकून कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करत 'एमआय' (Mi) या सुप्रसिद्ध मोबाईल कंपनीच्या बनावट वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांना तब्बल 13 लाख 50 हजार 815 रुपये किमतीचा बनावट माल जप्त केला असून याप्रकरणी चार दुकान मालकांविरुध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजारपेठेत ब्रँडेड कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आणि कंपनीच्या बौद्धिक संपदेला (Intellectual Property) धोका निर्माण करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारण्याची ही घटना अत्यंत महत्त्वाची असून, या कारवाईमुळे बनावट वस्तूंच्या अवैध विक्रीच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे. एका प्रतिष्ठित खासगी तपास संस्थेच्या प्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये 'एमआय' कंपनीच्या हुबेहूब नकला असलेल्या मोबाईल कव्हर, मोबाईल ग्लास, डिस्प्ले, चार्जर वायर आणि इतर ॲक्सेसरीज मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत.
नेत्रिका कन्सल्टिंग इन्व्हेस्टिगेशन या कंपनीत तपासणी तज्ञ म्हणून कार्यरत असलेले विनायक घणश्याम वळवईकर (वय ५०, रा.मालाड ईस्ट, मुंबई ) यांनी या संपूर्ण कारवाईसाठी सक्रिय पुढाकार घेतला. वळवईकर यांची कंपनी 'नेत्रिका कन्सल्टिंग इन्व्हेस्टिगेशन' ही 'एमआय' या मोबाईल कंपनीच्या नावाचा आणि त्यांच्या लोगोचा वापर करून विविध बनावट उत्पादने विकली जात असल्याचे प्रकार शोधून त्यावर कारवाई करण्याचे कार्य करते. अशा प्रकारे बनावट साहित्याची नक्कल करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध कॉपीराईट कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी कंपनीने वळवईकर यांना अधिकृत अधिकारपत्र दिले आहे.
एवढेच नव्हे, तर कंपनीच्या बनावट उत्पादनांचा शोध घेण्यासाठी त्यांना तज्ञ व्यक्ती म्हणून विशेष प्रशिक्षणही देण्यात आलेले असून, त्यासंबंधीचे प्रमाणपत्रही त्यांच्याकडे आहे.
वळवईकर आणि त्यांचे सहकारी सुनील रत्नप्पा पुजारी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वैजापूर परिसराची पाहणी केली असता, त्यांना डेपो रोडवरील 'चामुंडा मोबाईल शॉपी', 'महादेव मोबाईल शॉपी', 'शिरीष मोबाईल शॉपी', 'लक्ष्मी मोबाईल शॉपी', 'रामदेव मोबाईल शॉपी' आणि 'माताजी मोबाईल शॉपी' या मोबाईल दुकानावर 'एमआय' या मोबाईल कंपनीचे मोबाईल कव्हर, मोबाईल ग्लास, मोबाईल डिस्प्ले, मोबाईलचे बँक कव्हर, मोबाईलचे पोको पॅनल आणि मोबाईल चार्जर वायर इत्यादी साहित्यांचे बनावटीकरण करून तयार केलेल्या मालाचा मोठा साठा होलसेल आणि किरकोळ स्वरूपात विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. या गंभीर प्रकारानंतर वळवईकर यांनी सदर ठिकाणी पोलीस कारवाई व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या कार्यालयात लेखी तक्रार अर्ज सादर केला होता.
या अर्जावरून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक एस.जी. मिसळे यांच्यासह हवालदार गोपाल पाटील आणि पो.कॉ. राहुल गायकवाड यांच्या
पथकाने बुधवारी (ता.10) दुपारी एक वाजता डेपो रोडवरील 'चामुंडा मोबाईल शॉपी, महादेव मोबाईल शॉपी, रामदेव मोबाईल शॉपी व माताजी मोबाईल शॉपी या मोबाईल दुकानावर छापा टाकून एमआय कंपनीचे 13 लाख 50 हजार 815 रुपये किमतीचे बनावट मोबाईल साहित्य जप्त केले.
या प्रकरणी चामुंडा मोबाईल शॉपीचे निवाराम विराजी देवासे (वय 30 वर्ष, डेपो रोड, वैजापूर) महादेव मोबाईल शॉपीचे गोपाल आसाराम देवाशी (वय 25 वर्ष, डेपो रोड वैजापूर), रामदेव मोबाईल शॉपीचे रमेशकुमार चंन्नाराम चौधरी (वय 31 वर्ष, रा. लक्ष्मीनारायणनगर लाडगाव रोड, वैजापूर), माताजी मोबाईल शॉपीचे नकुलसिंग उत्तमसिंग राठोड (वय 28 वर्ष, रा. लक्ष्मीनगर कॉलनी वैजापूर) यांच्याविरुध्द कारवाई केली. या व्यतिरिक्त पोलीस पथकाने 'लक्ष्मी मोबाईल शॉपी' आणि 'शिरीष मोबाईल शॉपी' या दोन दुकानांना भेट दिली असता, ती दोन्ही दुकाने बंद स्थितीत आढळून आली.
0 Comments