news today, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे विलीनीकरण होणार ?

मुंबई, ता.30 - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाची वाटचाल विलिनिकरणाच्या दिशेने सुरू झाली असून पुढील काही दिवसांत या विषयावर दोन्ही गटाच्या नेत्यांच्या बैठका होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावेत अशी दोन्ही पक्षातील नेते, आमदार आणि मंत्र्यांची भावना आहे. अलीकडच्या काळात पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही अशीच भूमिका होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांनी राज्यात काही ठिकाणी नगरपालिका निवडणूक एकत्रितपणे लढवल्यानंतर दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाली. नगरपालिका निवडणुकीनंतर पुणे, पिंपरी - चिंचवड या मुख्य महानगरपालिकांमध्येही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली, तर जिल्हा परिषद निवडणुकीतही अनेक ठिकाणी दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवत आहेत.एकत्र निवडणूक लढविली जात आहे तेथे दोन्ही गटाचे निवडणूक चिन्ह घड्याळ आहे. स्वतः अजित पवार यांनी दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत यापूर्वी दिले होते.मात्र, आता अजित पवारच राहिले नसल्याने यासंदर्भात पुढे काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. 

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही गटाच्या विलीनीकरणाबाबत महत्वाचे भाष्य केले आहे.आता सत्य बोलणे गरजेचे आहे, महानगरपालिका निवडणुकीनंतर एकत्र येऊ असे अजितदादा म्हणाले होते.त्याअनुषंगाने बैठकाही झाल्या .अजित पवार हे शरद पवारांकडे पाहूनच हे बोलत होते. आता त्यादृष्टीनेच आमची वाटचाल होईल असे शिंदे यांनी गुरुवारी (ता.29) सांगितले. तर दोन्ही गट एकत्र आलेच आहेत , आता वेगळे राहून चालणार नाही.एकत्रच रहावे लागणार आहे.असे विधान अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. आम्ही एकत्र आलो की काही लोकांच्या पोटात दुखायला का लागतं ? असे विधान अजित पवार यांनीही एका जाहीर सभेत केले होते. त्यामुळे विलिनीकरणाबाबत दोन्ही गटांकडून सकारात्मक भूमिका आहे.  मात्र भाजपबरोबर जाण्यास विरोध असलेले शरद पवार याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. राजकारणापासून अलिप्त राहत शरद पवार या विलिनीकरणाला विरोध करणार नाहीत ,असे शरद पवार गटातील नेत्यांना वाटते. 

दोन्ही गट एकत्र यावेत ही अजित पवार यांची इच्छा होती  - जयंत पाटील 
अलीकडच्या काळात अजित पवार यांची भूमिका होती की दोन्ही गट एकत्र यावेत, पुन्हा सगळे एकसंघ व्हावे. यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठकाही झाल्या होत्या. त्यानंतर आमच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची त्यांच्याबरोबर बैठक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर याबाबत निर्णय घ्यावा अशी त्यावेळी चर्चा झाली होती. असे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले.

Post a Comment

0 Comments