वैजापूर, ता .30 - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय हालचालींनी शिवसेना–भाजप युतीचा खरा चेहरा उघडा पाडला आहे. कागदोपत्री युती असली, तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधातच पडद्याआडून ‘बाण’ सोडले जात असल्याने ही युती आहे की उघडउघड मैत्रीपूर्ण लढत ? असा थेट सवाल मतदारांमध्ये उपस्थित होत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर चर्चेचे गुऱ्हाळ संपले आणि युतीवर अधिकृत मोहोर लागली. त्यानुसार शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या 5 व पंचायत समितीच्या 10 जागा, तर भाजपला जिल्हा परिषदेच्या 3 व पंचायत समितीच्या 6 जागा मिळाल्या. मात्र ही आकडेमोड कागदावरच मर्यादित राहिली. प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर दोन्ही पक्षांनी युतीधर्मालाच हरताळ फासल्याचे चित्र दिसत आहे. संवदगाव जिल्हा परिषद गटात भाजपने ऐनवेळी प्रीती इंगळे यांना पुरस्कृत करत थेट मैदानात उतरवले. एवढेच नव्हे, तर याच गटातील संवदगाव व जरुळ गणांमधील अपक्ष उमेदवारांनाही भाजपने पाठिंबा देत आपली स्वतंत्र खेळी उघड केली. दुसरीकडे, वाकला व महालगाव जिल्हा परिषद गटांसह संबंधित गणांमध्ये शिवसेनेनेही उमेदवारांना पाठिंबा देत पुरस्कृत केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, ‘आधी त्यांनी केले, म्हणून आम्ही केले’ या भूमिकेत दोन्ही पक्ष अडकले आहेत. शिवसेनेचा दावा आहे की, संवदगाव गटासह गणांमध्ये भाजपने अगोदरच पुरस्कृत उमेदवार दिल्याने आम्हाला निर्णय घ्यावा लागला. तर भाजपकडूनही हाच युक्तिवाद पुढे केला जात आहे. दोन्ही बाजूंनी युती कायम असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र एकमेकांच्या पायावर पाय देण्याचे राजकारण सुरू आहे. या सवती दिंडीच्या राजकारणात सर्वाधिक फटका बसणार आहे तो युतीच्या अधिकृत उमेदवारांना. ‘मार तुम्ही द्यायचा आणि गोंजारायचेही तुम्हीच’ अशी अवस्था निर्माण झाल्याने अधिकृत उमेदवार अक्षरशः भरडला जाण्याची चिन्हे आहेत. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होऊ नये, अशी अपेक्षा असली तरी सध्याचे राजकीय डावपेच पाहता ही परिस्थिती इतर पक्षांच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे युतीचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवायचा आणि दुसरीकडे त्याच युतीला सुरूंग लावायचा? हा विरोधाभास आता उघडपणे समोर आला आहे. त्यामुळे आगामी काळात वैजापूरच्या राजकारणात आणखी कोणते धक्कादायक वळण येते? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
“संवदगाव गटासह गणांमध्ये भाजपने अगोदर उमेदवारांना पुरस्कृत केले. त्यामुळे आम्हीही वाकला व महालगाव गटातील उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवसेना–भाजप युती कायम आहे.”
— प्रा. रमेश बोरनारे, शिवसेना मुख्य प्रतोद तथा आमदार, वैजापूर
“शिवसेनेने वाकला व महालगाव गटात उमेदवार पुरस्कृत केल्याने आम्हालाही राजकीय निर्णय घ्यावा लागला. तरीही शिवसेना–भाजप युती कायम आहे.”
— डॉ. दिनेश परदेशी, नगराध्यक्ष तथा भाजप नेते, वैजापूर
0 Comments