वैजापूर, ता.30 - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह सहा जणांचा बारामतीत झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या घटनेनंतर वैजापूर तालुक्यातही शोककळा पसरली असून, अजित पवारांशी जोडलेल्या अनेक राजकीय व वैयक्तिक आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
11 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकरी मेळाव्यानिमित्त अजित पवार वैजापूर येथे आले होते. जिल्हा परिषद प्रशालेच्या (मुलांची) मैदानावर त्यांनी केलेले धडाकेबाज भाषण आजही वैजापूरकरांच्या स्मरणात ठसठसत आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखंड होता आणि अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून सत्ताधाऱ्यांवर अक्षरशः ‘आसूड’ ओढत होते.
वैजापूरच्या राजकारणातील निर्णायक क्षण!
त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आणि काँग्रेसचे नेते पंकज ठोंबरे यांच्यातील राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला होती. ठोंबरे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावरून वातावरण तापले होते. चिकटगावकरांचा या प्रवेशाला तीव्र विरोध होता आणि त्यांनी तो रोखण्यासाठी आपली संपूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, स्थानिक विरोधाची पर्वा न करता अजित पवार वैजापूरला आले, पंकज ठोंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला आणि या राजकीय नाट्यावर निर्णायक पडदा टाकला. हा कार्यक्रम पवारांचा वैजापूरमधील शेवटचा ठरला.
जिव्हाळ्याचे संबंध, नंतरचे दुरावे
तत्पूर्वी विधानसभा, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार अनेकदा वैजापूरमध्ये येऊन गेले होते. विशेषतः स्व. कैलास पाटील चिकटगावकर आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या दोन्हीही माजी आमदार बंधूंशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासाठी पवार वारंवार वैजापुरात येत असत. मात्र, कालांतराने चिकटगावकरांनी ‘घड्याळ’ सोडून आधी ‘शिवबंधन’ आणि नंतर ‘धनुष्यबाण’ हाती घेतल्यानंतर हे संबंध दुरावत गेले. पुढील टप्प्यात पंकज ठोंबरे हेच राष्ट्रवादीचे स्थानिक सर्वेसर्वा ठरले आणि अजित पवारांचा संपर्क त्यांच्याशी अधिक दृढ झाला. आज पवारांच्या संदर्भात वैजापूरकरांच्या आठवणी एकत्र जुळत आहेत. या आठवणी पुण्यासारख्या भव्य नसल्या, तरी वैजापूरच्या राजकीय इतिहासात त्या कायम लक्षात राहणाऱ्या आहेत, हे मात्र नक्की. आज अजित पवार हयात नसले, तरी वैजापूरच्या राजकीय इतिहासात त्यांचे भाषण, निर्णय आणि ठाम भूमिका कायम स्मरणात राहणार आहेत. त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर वैजापूरच्या राजकीय पटातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
नियोजित सभा अन् अपूर्ण राहिलेला योगायोग!
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ३ फेब्रुवारी रोजी वीरगाव येथे अजित पवारांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी नियोजनही पूर्ण झाले होते. मात्र, नियतीनेच त्यांना आधीच हिरावून नेले आणि सभा कागदावरच राहिली. विशेष म्हणजे, गेल्यावेळीही ते फेब्रुवारी महिन्यातच वैजापूरला आले होते आणि आताही फेब्रुवारीतच येणार होते. हा केवळ योगायोग म्हणावा लागेल.
0 Comments